Share/Bookmark

७ डिसें, २०११

शेअरबाजाराचे तोंड पहाणार नाही असा निर्णय घेतला असेल तर ...........


मित्रहो,
       खूप दिवसांनी येथे लिहिताना मला आनंद होत आहे. आज ही पोस्ट लिहिताना, गेल्या वर्षभरात शेअरबाजारात झालेल्या तीव्र घसरणीचा संदर्भ येणे साहजिक आहे. आपल्यापैकी सर्वचजण या 'जागतिक' घसरणीमुळे कमी अधिक प्रमाणात तोटा झेलत असणार, पण असे असले तरी अशा वाईट काळामधून प्रत्येक वेळेला बाजार सावरत आलेला आहे हाच इतिहास आहे. तेव्हा सर्वप्रथम मला सांगायचे आहे कि निराश न होता वाट बघा. बाजार स्वस्त झालेला असताना खरेदी करणे मानसिकदृष्ट्या कठीण असते. मात्र काही खरेदी करता नाही आली तरी चालेल, पण हातातील 'उत्तम कंपन्यांचे शेअर्स' पडेल भावात विकण्याची चूक करू नका, कारण याच क्षणाची बाजारातले 'मोठे मासे' वाट बघत असतात.
       आता मी म्हटले कि 'उत्तम कंपन्यांचे शेअर्स...'- म्हणजे नेमके काय ?  उत्तम कंपन्या निवडण्याचे अनेक मार्ग आहेत, त्याप्रमाणे अभ्यास करूनच आपण त्यांची खरेदी केलेली असणार, तरीही तुमच्या मनात शंका असेल कि 'जेव्हा कधी बाजार चढेल तेव्हा माझ्याकडील कंपन्यांच्या शेअर्सचे भाव नक्की वाढतील ना ?'
        आता असे वाटण्याला कारणही तसेच आहे- २००८ मधील मंदीपूर्वी जे शेअर्स तेजीचे नवनवे विक्रम करत होते- (आठवा... पुंज लोइड, डीएलएफ, सुझलोन, युनिटेक इ. अनेक)- ते शेअर्स काही वाईट
कंपन्यांचे नव्हते, मात्र २००९ मध्ये बाजार सावरला गेल्यानंतर आणि पुन्हा सेन्सेक्स २१००० झाल्यानंतरही हे काही शेअर्स पूर्वीची तेजी दाखवू शकले नाहीत. आजही यात गुंतवणूक असलेले माझे अनेक मित्र मला माहीत आहेत.
        तर हे सर्व सांगायचा हेतू हा कि ' सार्वत्रिक मंदीमध्ये आपलेकडील शेअर्स घसरले तर त्याला उपाय नसतो आणि दुःखही तितके होत नाही, मात्र बाजार चढत असतानाही 'फक्त आपलेकडील' शेअर्स
वाढत नसतील तर तीव्र दुःख होते...' मग सर्व शेअरबाजाराचाच राग येवू लागतो आणि अनेकजण निराशेने पुन्हा बाजाराचे तोंड न बघण्याचे ठरवितात. - माझे आजचे लिखाण अशाच मित्रांसाठी आहे.
 आता बाजार चढतो म्हणजे नक्की काय होते? आपल्याकडे सेन्सेक्स आणि निफ्टी या निर्देशांकांच्या आधारे वध-घट ठरवली जाते.  सेन्सेक्समध्ये BSE मधील निवडक ३०, व निफ्टीमध्ये NSE मधील
निवडक ५० शेअर्सच्या भावांनुसार निर्देशांक ठरवला जातो, हे आपल्याला माहीत असेलच. यात प्रत्येक कंपनीला एक ठराविक वेटेज (वजन) दिलेले असते. उदा. रिलायन्स, ओएन्जीसी, कोल इंडीया या काही
मोठ्या आकाराच्या कंपन्यांना जास्त वेटेज असते. साहजिकच जास्त वेटेज असलेल्या कंपन्याच्या भावामधील चढ-उताराचा निफ्टी वा सेन्सेक्सवर अधिक परिणाम होतो, आणि कमी वेटेज असलेल्या
शेअर्सच्या भावामधील चढ-उताराचा निर्देशांकावर तितकासा परिणाम होत नाही. याचाच परिणाम असा होतो कि, काही प्रमुख कंपन्यांमध्ये खरेदी होवून सेन्सेक्स वा निफ्टी वाढलेला तर दिसतो, मात्र तरीही कमी वेटेज असलेले काही शेअर्स न वाढता तसेच राहिलेले किंवा उतरलेलेही असू शकतात. आता बाजारातले 'मोठे मासे' कधी कुठल्या शेअर्समध्ये  खरेदी करतील हे आपल्याला नेहेमीच कळू शकत नाही. आणि म्हणूनच सामान्य गुंतवणूकदार निराशेचा धनी होतो.
 मग यावर उपाय काय? यावर एक 'ढोबळ उपाय' असा कि जास्त वेटेज असलेल्या कंपन्यांमध्ये आपली गुंतवणूक ठेवणे. (सेन्सेक्स मधील लेटेस्ट वेटेज ची यादी मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.)   पण मग काही उदाहरणे अशीही आहेत कि एखादी जास्त वेटेज असलेली कंपनी, उदा. रिलायन्स गेले २ वर्षभर बाजाराच्या तुलनेत पडेल भाव दाखवत आहे. आता काय करावे ?
मग चढत्या बाजारात तरी निर्देशांकानुसार नक्की चढत जाईल असा कुठला शेअर असेल का? - तर मित्रांनो,... होय, आहे...! त्याचीच माहिती आज घेवूया.
    बेन्चमार्क या असेट मेनेजमेंट कंपनीने २००८ च्या जानेवारीमध्ये भारतातील  Nifty BeES या पहिल्या ETF (एक्स्चेन्ज ट्रेडेड फंड) ची स्थापना केली.
हा एक शेअर नसून, ETF असला तरी तो
NSE वर अगदी एखाद्या शेअरप्रमाणेच खरेदी अथवा विक्री करता येतो. म्हणजेच बाजारात कधीही  NiftyBeES चे अगदी एक युनिटही आपण खरेदी वा विक्री करू शकतो, कितीही काळ 'होल्ड' करून ठेवू शकतो.-
प्रत्येक NiftyBeES युनिट  हे रु.१० एवढ्या दर्शनी मूल्याचे(Face Value) असून बाजारातील त्याची किंमत ही निफ्टी निर्देशांकाच्या सुमारे एक दशांश (१/१०) एवढी असते. (किंवा आपण येथे 'युनिट' ऐवजी 'शेअर' म्हणायलाही काही हरकत नाही, कारण आपल्या दृष्टीने हा एखाद्या शेअरप्रमाणेच असून त्याप्रमाणेच बाजारात त्याचे व्यवहार होतात) म्हणजेच आजची निफ्टी इंडेक्सची किंमत ५००० असेल तर या NiftyBeEs ची बाजारातील किंमत साधारणपणे ५०० रु.च्या आसपास असते. जसा बाजार किंवा निफ्टी वर-खाली होइल तसाच हाही स्वस्त आणि महाग होत असतो, किंवा असेही म्हणता येइल कि  निफ्टीवरच हा आधारभूत असतो.
 
  
NSE वर याचा सिम्बोल 'NIFTYBEES'असा आहे, तर BSE वर याचा 'टिकर नं.' 590103 आहे. मात्र याचे व्यवहार NSE वरच करावेत, कारण BSE वर याचे  व्यवहार अतिशय मर्यादीत होतात म्हणजेच
Volume कमी असल्याने Bid price - Ask price मध्ये खूप तफावत राहून त्यामुळे योग्य किंमत न मिळण्याची शक्यता असते. एनएसई वर मात्र भरपूर Volume असतो.
   निफ्टीबीझ चे फायदे -
 # इतर कोणत्याही शेअरप्रमाणे आपण आपल्या ब्रोकरला सांगून सहजपणे खरेदी वा विक्री करू शकतो.
 # निफ्टीच्या म्हणजे बाजाराच्या चढउतारानुसार हा वर-खाली होत असल्याने Short Term वा Long Term दोन्ही प्रकारच्या ट्रेडर्सना सोयीस्कर.
 # निफ्टीच्या किंमतीच्या एक दशांश किंमतीस मिळत असल्याने छोट्या गुंतवणूकदारांना सहज घेता येतो. (निफ्टी फ्युचर्सचे व्यवहार हे तुलनेने अधिक महाग असून Risky ही असू शकतात)
 # वरीलप्रमाणे ट्रेडींगसाठी सोयीस्कर असल्याने बाजारात उत्तम Volume असतात.
 # याची किंमत ही निफ्टीमधील ५० शेअर्सच्या किंमतीवर आणि त्यांच्या Demand-Supply वर थेट अवलंबून असून कोणा फंड मेनेजरच्या कामगिरीवर अवलंबून नसते.
 # निफ्टीबीझचा एक शेअर घेणे म्हणजे भारतातल्या ५० प्रमुख कंपन्यांमध्ये एकाचवेळी गुंतवणूक करण्यासारखे आहे. यामुळे सगळा पैसा एकाच कंपनीमध्ये वा सेक्टरमध्ये गुंतवला जात नाही, आणि  भांडवल नष्ट होण्याचा धोका रहात नाही.
 वरील सर्व फायद्यांमध्ये थोडासा तोटा असा आहे कि  निफ्टीबीझ हा इतर शेअर्सच्या तुलनेत मंद हालचाल करतो, कारण तो ५० शेअर्सशी निगडीत आहे. म्हणजेच निफ्टी १०० पोइन्टने हालेल तेव्हा निफ्टीबीझ साधारणपणे १० पोइन्टने हालेल, पण याला तोटा न म्हणता मी स्थिरता आणि सुरक्षितता म्हणेन !
 यापूर्वी 'निफ्टी पी/ई' आणि त्याआधारे करता येणारी गुंतवणूक याविषयी मी येथे लिहिलेले आपणास आठवत असेलच. मग आता जेव्हा 'निफ्टी पी/ई रेशो' स्वस्त होवून गुंतवणूक करावीशी वाटेल तेव्हा नक्की कुठला शेअर घ्यावा हा प्रश्न पडायला नको ...  निफ्टीबीझ घ्या आणि बाजार वाढेल तेव्हा हमखास फायद्याची हमी बाळगा !
शेअरबाजारात कधी कोणी फायद्याची हमी देत नसतो, मात्र 'चढत्या बाजारात तरी' नक्कीचा फायदा याद्वारे मिळवा आणि शेअरबाजाराचे तोंड पुन्हा पहाणार नाही असा निर्णय घेतला असेल तर पुन्हा एकदा
विचार करा ....!

Read more »

१४ ऑग, २०११

शेअरबाजारात १०० टक्के नफा कमवायचाय?

शेअरबाजारात १०० टक्के नफा कमवायचाय?-१०० टक्के अचूक (Sure-Shot) टिप्स-
  "आमच्या वर्षानुवर्षाच्या निरीक्षण आणि अभ्यासानंतर आणि अतिशय मेहनत घेवून आम्ही अशी एक ट्रेडींगची पद्धत(STRATEGY) तयार केलेली आहे कि त्यानुसार  पुढील महिन्यात शेअरबाजार वर चढणार कि खाली येणार याचा १०० टक्के अचूक अंदाज करता येतो.दर महिन्याच्या सुरुवातीला आम्ही  तुम्हाला इमेल ने ही "१०० टक्के अचूक टीप" पाठवत जावू. आपणांस जर आमचा परफोर्मन्स पहायचा असेल तर ४ टिप्स ट्रायल म्हणून/पूर्णपणे मोफत दिल्या जातील. इच्छूकांनी आपला इमेल पत्ता आम्हाला कळवावा." 
           थांबा...थांबा ....हे मी म्हणत नाहीये ! तर -अशा प्रकारची जाहिरात इंटरनेटवर पाहिलीत तर आपली प्राथमिक प्रतिक्रिया काय होईल?
  मला खात्री आहे कि बहूतेक जण - "बघु या तरी या टीप्स किती अचूक ठरतायत त्या-" असे म्हणून यात (चकटफू म्हणून तरी नक्की) रस घेतील.
 विविध मिडीया,इंटरनेट आणि सोशल नेटवर्कच्या मदतीने, सदर जाहिरात वाचलेल्या लाखो वाचकांपैकी  हजारो जण आपले इमेल पत्ते पाठवून या "फ्री टीप्स" ची मागणी करतील.

    समजा "अमोल" हा या फ्री टीप्सचा एक सबस्क्राइबर आहे. १०० टक्के अचूक टीप्सची त्याला उत्सुकता आहे, मात्र तो तसा विचारी आहे. या टीप्सच्या अचूकतेबद्दल त्याला शंकाही आहेत.
त्याला इमेल द्वारे पहिली टीप मिळते - त्यानुसार या महिन्यात बाजार तेजी दाखवणार असून खरेदीचा सल्ला दिला जातो. अमोल आता महिनाभर नुसते निरीक्षण करायचे ठरवतो.बाजारात हळूहळू पण सतत वाढ होत जाते, आणि महिनाअखेरीस बाजाराने चांगलीच वाढ दाखवलेली असते.अशा प्रकारे पहिल्या महिन्याची टीप १०० टक्के अचूक ठरलेली असते.अमोल खूष होतो,पण सावधही असतो. सलग तीन टीप्स बरोबर आल्या तरच तो त्यानुसार बाजारात पैसे लावायचे ठरवतो.
अमोलला आता दुसर्या महिन्याच्या टीप्सविषयी उत्सुकता लागून रहाते.

अखेर दुसर्या महिन्याची टीप येते- त्यानुसार बाजार आणखी वर जाणार असतो.अमोलला जरा नवल वाटते, कारण बाजार आता महाग झाला आहे याची त्याला जाणीव असते.काही दिवस बाजार त्याच पातळीवर राहून पुन्हा एकदा उसळी घेतो आणि महिना अखेरीस त्याने नवी उंची गाठलेली असते.याही वेळी प्रत्यक्ष बाजारात पैसे न घालता त्याने नुसतेच निरीक्षण केलेले असते.जर टीप्सनुसार पैसा लावला असता तर- त्याला वाटून जाते. पण सलग तीन टीप्स अचूक ठरल्या तरच पैसे लावू या -उगाच रिस्क कशाला घ्या? असे म्हणून तो पूढील महिन्याच्या टीप्सची वाट बघू लागतो.

लवकरच तिसर्या महिन्याची टीप येते. यावेळेस जरा वेगळी टीप असते.बाजारात या महिन्यात घसरण होणार असल्याचा इशारा देवून वेळीच विक्री करून पैसा मोकळा करण्याचा सल्ला दिलेला असतो.याचवेळी टीव्हीवरचे एक्स्पर्ट, इतर मिडीयावाले मात्र बाजाराची तेजी अशीच काही काळ चालू रहाणार असल्याचे सांगत असतात.त्यासाठी उत्तम औद्योगिक प्रगतीचे दाखलेही दिले जात असतात.अमोलची उत्सुकता आता ताणली जाते.यावेळी तरी टीप खोटी ठरणार असेच त्याला वाटत असते.पण घडते उलटेच! बराच महाग झालेला बाजार वाढायचा थांबतो, आणि रोज थोडा थोडा घसरत जावून महिना अखेरीस तर जोराने खाली येतो. याही वेळी टीप १०० टक्के अचूक ठरलेली असते.अमोल आता मात्र उत्साहित होतो.या टीप्सच्या खरेपणाबद्दल त्याला आता खात्री पटत चाललेली असते. तेव्हा आता चौथ्या म्हणजेच शेवटच्या फ्री टीप्सचा थोडा फायदा करून घ्यायचे तो ठरवतो. यावेळी तो टीप्सनुसार बाजारात व्यवहार करायचे ठरवतो, मात्र तरीही थोडी  सावधगिरी म्हणून फक्त २५००० रु. लावायचे ठरवतो.

अखेर शेवटची फ्री टीप देणारा इमेल येतो. यावेळेला बाजारात खरेदीचा सल्ला दिलेला असतो.कारण बाजार पुन्हा वरची दिशा धरणार असल्याचे स्पष्ट म्हटलेले असते.अमोल त्यानुसार काही शेअर निवडून त्यात खरेदी करतो. खरेतर महिन्याच्या सुरुवातीला तरी बाजारात मंदीचे वातावरण असते.संथपणाने बाजार खाली खालीच जात असतो.वाढती महागाई,महाग होत असलेले क्रूड तेल,आखातातील युद्ध इत्यादी बातम्या वातावरण अधिकच गढूळ करत असतात.सर्व एक्स्पर्टही बाजार आणखी किती खाली जावू शकेल याचे विश्लेषण करत असतात. अमोलने घेतलेले शेअरही तोट्यात जावू लागतात.अमोलला आता आपले चूकले असे वाटू लागते, पण तो महिनाअखेर पर्यंत थांबायचे ठरवतो. दरम्यान अर्थमंत्री काही निवेदन करतात, रिजर्व बेंक आणि म्युचुअल फंड काही धोरणात्मक निर्णय घेतात-आणि काय आश्चर्य! बाजार अचानक उलटा फिरतो.वेगाने वाढत जावून महिन्याच्या शेवटी तर प्रचंड वाढलेला असतो. अमोलचे शेअर्सही ८००० रु.ची भरघोस वाढ दाखवत असतात.
"१०० टक्के अचूक टीप्स"वर त्याचा आता मात्र पक्का विश्वास बसतो. अमोलला दुहेरी आनंद झालेला असतो, कारण त्याला झालेल्या फायद्याबरोबरच भविष्यातील गडगंज फायद्याची स्वप्ने पडू लागलेली असतात.
अमोलसारखाच फायदा झालेले आणखीही बरेच "लकी" लोक असतात. त्या सर्वांना काही दिवसांनी एक इमेल येतो.-
"आम्ही आतापर्यंत आपल्याला ४ महिन्याच्या ४ अचूक टीप्स पाठवल्या असून त्याची विश्वासार्हता आपल्याला नक्कीच पटली असेल.आपल्यापैकी काहीजणांनी तर भरघोस फायदाही कमवला असेल. हे सर्व आमच्या वर्षानुवर्षाच्या सखोल अभ्यासाचे फलित आहे.सदर टीप्सचा लाभ यापूढेही मिळत रहाण्यासाठी आपल्याला आमची वार्षिक सबस्क्रीप्शन फी म्हणून फक्त २५००० रु. भरायचे आहेत, आणि अशाच १०० टक्के अचूक टीप्स आम्ही तुम्हाला वर्षभर पाठवत जावू.

अमोलला आता करायचे असते एवढेच कि "१०० टक्के अचूक टीप्स" कायम मिळण्यासाठी सब्स्क्रीप्शन म्हणून थोडेसे पैसे भरायचे आणि नंतर? नंतर अफाट फायदा कमवायचा.
अमोल मग वेळ घालवत नाही.वर्षभराची फी म्हणून २५००० रु. भरतो आणि "१०० टक्के अचूक टीप्स" नुसार ट्रेड करून मोठा फायदा कमवण्यासाठी बाजारात बराच पैसाही ओततो.
पण होते काय, कि दर महिन्याला नियमीतपणे टीप्स तर येतात पण कधी त्या बरोबर ठरतात तर कधी चूक ! -म्हणजे पहिल्या ४ महिन्याप्रमाणे "१०० टक्के अचूक" असे काही होताना दिसत नाही. अशा प्रकारे काही महिने जातात. बाजारात अमोलचा बराच पैसा अडकून बसतो.त्याने पाहिलेली गडगंज फायद्याची स्वप्ने कुठल्याकुठे विरून जातात.  - त्यांनी तर १०० टक्के अचूकतेची खात्री दिली होती ! मग हे असे कसे झाले? का झाले ? त्याने पुन्हा पुन्हा त्यांची जाहिरात अणि इमेल वाचून काढले- तर त्याखाली बारीक अक्षरात एक तळटीप दिलेली आढळली-
डिस्क्लेमर- "आमच्या टीप्स या खरोखरच अचूक असल्या आणि आमच्या सबस्क्राईबर्सना आम्ही त्याची खात्री देत असलो तरी कायदेशीररित्या आम्ही तशी हमी देवू शकत नाही."
आता काय करावे ते त्याला कळेचना!
 तुम्ही अंदाज करू शकाल का कि नेमके झाले होते तरी काय ?

नेमके झाले होते असे कि सुशिक्षीत आणि विचारी असलेला अमोल सुद्धा चक्क एका "STOCK-TIPS-SCAM" ला बळी पडला होता.
कसा ते आपण बघुया-
सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे जाहिरातीच्या मदतीने इमेल पत्ते किंवा मोबाइल क्रमांक मिळवून किमान दहाहजार जंणांचा एक सबस्क्राइबर ग्रूप केला जातो.यापैकी निम्म्या म्हणजे ५००० लोकांचे दोन गट केले जातात.यापैकी एका गटाला बाजार वाढणार असल्याचा म्हणजेच खरेदीचा सल्ला दिला जातो, तर दुसर्या गटाला बाजार घसरणार असल्याचा म्हणजेच विक्रीचा सल्ला दिला जातो.
महिन्याच्या शेवटी साहजिकच कोणत्यातरी एका गटाला म्हणजेच तब्बल ५००० जणांना "१०० टक्के अचूक" टीप पोचलेली असते.
दुसर्या महिन्यात आधीच्या दोन गटांपकी फक्त या "लकी" ठरलेल्या ५००० लोकांनाच पुन्हा टीप दिली जाते -अर्थातच पुन्हा २५०० जणांचे दोन गट केले जातात, व त्यातील एका गटाला खरेदीचा तर दुसर्या गटाला विक्रीचा सल्ला दिला जातो. दुसर्या महिन्याअखेरीस ज्या गटाला अचूक सल्ला पोचला आहे अशा २५०० जणांचे पुन्हा एकदा प्रत्येकी १२५० जणांचे दोन गट करून त्यांना तिसर्या महिन्यासाठी पूर्वीप्रमाणेच खरेदी व विक्रीचा सल्ला दिला जातो. तिसर्या महिन्याच्या अखेरीस साहजिकच १२५० जणांना अचूक टीप मिळालेली असते.यातले बहूतेक लोक आता या टीप्सवर पक्का विश्वास ठेवू लागलेले असतातच. त्यातच चौथ्या महिन्यासाठीची टीप येते-अर्थातच याहीवेळी ६२५ जणांना खरेदीचा व ६२५ जणांना विक्रीचा सल्ला दिलेला असतो.
अशा प्रकारे चार महिने सलगपणे चार अचूक टीप्सचा लाभ झालेले तब्बल ६२५ लोक असतात. आणि अमोल नेमका याच लकी(!) ६२५ जणांमध्ये होता.

आता पुढचा हिशेब मी सांगायला हवा ? थोड्याफार फरकाने या ६५० पैकी सर्वच जण अमोलप्रमाणेच विचार करतात आणि १०० टक्के अचूक टीप्सच्या आशेने एका वर्षासाठी २५००० रु.हसत हसत भरतात. समजा अगदी कमीतकमी म्हणजेच सुमारे ३०० जणांनी जरी पैसे भरले तर एकूण रक्कम होते चक्क ७५ लाख रु.!!!
शेअरबाजाराचा कुठलाही अभ्यास न करता काही मंडळी फक्त असे उद्योग करतात आणि अमाप पैसा कमावतात.या आणि अशा प्रकारांपासून मराठी गुंतवणूकदार/ट्रेडर्सनी नेहमी सावध राहिलेले बरे म्हणून, इंटरनेटवर मुशाफिरी करता करता अशा SCAM बद्दल वाचनात आले ते माझ्या वाचकांपुढे ठेवावेसे वाटले.
आशा आहे कि आपणा सर्वांस ही माहिती उपयुक्त वाटेल.

Read more »

१५ मे, २०११

रिलेटीव्ह स्ट्रेंग्थ इंडेक्स (RSI) चा ट्रेडींगमध्ये कसा वापर कराल ?

तांत्रिक विश्लेषणाची ओळख : भाग १४
इंडिकेटर्स आणि ओसिलेटर्स -
 रिलेटीव्ह स्ट्रेंग्थ इंडेक्स (RSI)
यामागील भागात आपण मूव्हींग एवरेजेसविषयी माहिती घेतली. त्याहीपूर्वी आपण बघितले आहे कि एखाद्या शेअरच्या किंमतीचा ट्रेन्ड ठरविताना "ट्रेडींग वोल्युम" फार महत्वाचे असतात-जसे कि साधारणपणे अपट्रेन्ड सुरू असताना वोल्युमही चांगला असेल तर तो अपट्रेन्ड टिकाऊ असतो, याऊलट डाऊनट्रेन्डमध्ये जास्त वोल्युम असतील तर डाऊनट्रेन्डही अधिक काळ चालू शकतो इ.इ.
मी याचा येथे पुन्हा उल्लेख यासाठी करतोय कि मूव्हींग एवरेजेस या संकल्पनेमध्ये वोल्युम विचारात घेतलेले नसल्याने ट्रेन्ड आणि ट्रेन्ड-रिवर्सल सिग्नलच्या अचूकतेवर मर्यादा येतात. म्हणूनच आणखी काही इंडीकेटर्स (कि ज्यात वोल्युमही विचारात घेतले जातात) मूव्हींग एवरेजसह वापरून अधिक अचूक सिग्नल मिळवण्याचा प्रयत्न केला जातो.
 अशांपैकी रिलेटीव्ह स्ट्रेंग्थ इंडेक्स, आणि विल्यम % रेश्यो या दोघांबाबत येथे माहिती घेऊया.हे दोन इंडीकेटर एका ठराविक रेन्जमध्ये फिरत असल्याने त्यांना ओसिलेटर्स म्हटले जाते. हे इंडीकेटर कसे तयार केले किंवा त्याचे मोजमाप कसे करतात त्याची माहिती असणे ट्रेडींगसाठी आवश्यक नसून त्याचा वापर कसा करतात हे समजणे महत्वाचे आहे. हल्ली इंटरनेटवर ओनलाईन चार्टींग सेवा सहज उपलब्ध असल्याने (जास्त खोलात न जाता) आपण हे "रेडीमेड" इंडीकेटर्स आपल्या ट्रेडींग सेट-अप मध्ये वापरू शकतो.
कृपया खालील आकृती पहा -

रिलेटीव्ह स्ट्रेंग्थ इंडेक्स हा (RSI) या नावाने प्रसिद्ध असून ० ते १०० या रेंजमध्ये तो फिरत असतो. य़ा RSI ची किंमत ८० च्यावर गेली तर संबंधित शेअर हा Overbought किंवा अतिमहाग झाला असे समजतात, आणि २० च्या खाली गेली तर Oversold किंवा स्वस्त झाला असे समजतात.
   या प्राथमिक माहितीनंतर  "गूगल फायनान्स" या उत्तम सेवेचा उपयोग करून RSI चा वापर कसा करतात ते प्रत्यक्ष बघण्यासाठी -
 इंटरनेट उघडून address bar मध्ये 
http://www.google.com/finance?q=nse%3Anifty  असे copy-paste करून सर्च करा.

 आता आपल्याला निफ्टी निर्देशांकाचा ३ दिवसांचा डीफोल्ट चार्ट दिसत आहे.निफ़्टीऐवजी आपण वरील चौकटीत त्या शेअरचे NSE स्क्रिपनेम किंवा BSE Ticker no. टाकून कोणत्याही शेअरचा ग्राफ बघू शकतो.चार्टच्या चौकटीच्या वरील डाव्या कोपर्यात 1d 5d 1m 3m असे लिहिलेले आहे, त्यावर क्लिक करून एक दिवस (intraday chart),५ दिवस, एक महिना अशा विविध कालावधीचे चार्ट आपल्याला बघता येतात.
चार्टच्या खालील बाजूस Technicals असे लिहिलेले आहे त्यावर क्लिक करा आणि RSI हा पर्याय निवडा. आता चार्टच्या खाली RSI चा ग्राफ दिसू लागेल.यात डाव्या कोपर्यात RSI(10,2Min) असे लिहिलेले आहे, त्याचा अर्थ दर दोन मिनिटांनंतर घेतल्या गेलेल्या गेल्या १० रिडींगच्या आधारे (म्हणजेच गेल्या २० मिनिटांच्या काळाचा) हा RSI चा ग्राफ आहे.गूगल फायनान्स मध्ये RSI चा डिफोल्ट पिरीअड १० आहे, मात्र आपल्या गरजेप्रमाणे आपण तो बदलू शकतो. आपण जास्त कालावधीचा चार्ट निवडल्यास उदा.१ महिना, तर RSI ची रिडींगही दोन मिनिटांऐवजी ३० मिनिटांनी आपोआप घेतली जाण्याची सोय गूगलने आपल्याला दिली आहे.
    RSI च्या ग्राफच्या वर RSI ची सर्वात लेटेस्ट किंमत निळ्या रंगात दिलेली आहे, ती ट्रेडींग सुरू असताना आपोआप बदलत जाताना आपल्याला दिसेल. मात्र कधीकधी इंटरनेटचा स्पीड कमी असेल तर आपल्याला रिफ्रेश करावे लागते. असो.
   आता जेव्हा शेअरची वा निर्देशांकाची किंमत खूप वाढलेली असते तेव्हा  RSI ची किंमतही ८० पेक्षा जास्त अगदी १०० पर्यंतही वाढते, अशा वेळी तो शेअर Overbought किंवा खूप महाग झाला आहे असे समजतात, आणि RSI ची किंमत २० पेक्षा कमी असेल तर ती Oversold म्हणजेच स्वस्त असे समजतात.मग असा सिग्नल मिळाल्यावर खूप महाग किंवा खूप स्वस्त झालेल्या शेअरमध्ये लगेचच खरेदी किंवा विक्रीचा निर्णय घ्यावा का? तर येथे एक महत्वाची बाब अशी आहे कि आपल्याला महाग किंवा स्वस्त असल्याची सूचना तर मिळाली आहे, मात्र आणखी किती काळ ही अवस्था राहणार आहे, आणि नेमका कधी ट्रेन्ड रिवर्सल होणार आहे ते मात्र आपल्याला अद्याप कळलेले नाही.(येथेच मार्केट हे कोणत्याही टेक्निकल्स आणि कोणत्याही ट्रेडींग सिस्टमपेक्षा श्रेष्ठ ठरते.)
    प्रत्यक्षात मार्केटमध्ये अशी परिस्थिती येते कि RSI ची किंमत ८० च्यावर किंवा अगदी १०० जरी दर्शवत असेल तरी त्या शेअरची किंमत मात्र आणखी काही काळ वाढतच रहाताना दिसते. तेजीच्या कालावधीत किंवा Strong Uptrend मध्ये असे होतच असते.अशा वेळी बारीक लक्ष ठेवून जेव्हा शेअरची किंमत किंचीत उताराला लागेल आणि त्याचवेळी RSI ची किंमतही वरून खाली येताना ८० पेक्षा खाली आली- याला RSI Exhaust होणे असे म्हणतात- तर तो ट्रेन्ड रिवर्सल असण्याची दाट शक्यता असते.येथे आपण तो शेअर विकण्याचा निर्णय घेतला तर यशाची शक्यता जास्त असते.
   याचप्रमाणे Oversold स्थितीमध्ये शेअरची किंमत अगदी तळाला असून, RSI २० ते ०  या दरम्यान असेल,आणि शेअरची किंमत किंचीत वाढायला लागली आणि RSI खालून वरच्या दिशेने २० च्यावर सरकू लागला तर खरेदीचा निर्णय घेतला जातो. मात्र यानंतरही क्वचित वेळी शेअरची किंमत पुन्हा मुळ दिशेने जाण्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही, कारण कोणतीही सिस्टीम आपल्याला १००% अचूक सिग्नल देवू शकत नाही.
त्यामुळे साहजिकच अधिक अचूकतेच्या शोधात प्रत्येक ट्रेडर असतो- ते गरजेचेही आहे.
 RSI प्रमाणेच "William % Ratio" हा ही एक इंडीकेटर प्रचलित असून " W%R " या नावाने ओळखला जातो. गूगल फायनान्स मध्ये हा ही उपलब्ध आहे. याची रचना आणि रेंज ही RSI प्रमाणेच असली तरी याचा अर्थ लावताना नेमका उलट लावला जातो, म्हणजेच याची किंमत  जेव्हा ८० ते १०० मध्ये असते, तेव्हा संबंधित शेअर हा स्वस्त समजला जातो आणि २० ते ० मध्ये असते तेव्हा संबंधित शेअर हा महाग समजला जातो.
   सामान्यत: हे दोन्ही इंडीकेटर्स एकाच प्रकारे काम करत असल्याने एकमेकांसह वापरत नाहीत. (जसे कि एकाच टीममध्ये दोन लेगस्पिनर निवडत नाहीत) पण माझ्या स्वत:च्या अनुभवानुसार RSI व W%R हे दोन्ही एकत्र वापरल्याने चूकीचे सिग्नल कमी होतात.त्याचप्रमाणे दोन्ही इडीकेटर्सचे पिरीअड सारखेच ठेवण्याची प्रथा असली तरी प्रयोगाअंती ते वेगळे ठेवून बघितल्यास मला चांगले रिझल्ट मिळाले आहेत, मात्र साधारणपणे इन्ट्राडे व शोर्टटर्म साठी पिरीअड १० वा १४ ठेवण्याची पद्धत आहे. पण याबाबतीत प्रत्येकाने प्रयोग करून बघायला हरकत नाही.
  लाइन चार्ट ऐवजी (गूगल फायनान्स मध्ये चार्टच्या खालील बाजूस settings वर क्लिक करून Chaart type मध्ये candlestick हा पर्याय निवडल्यास मिळणार्या )candlestick चार्टमध्ये ट्रेन्ड रिवर्सल चा अंदाज बांधताना, RSI वा W%R ने स्वस्त वा महाग सिग्नल दिल्यावर, candles चा रंग व दिशा बदलल्यावरच ट्रेन्ड रिवर्सलची खात्री केली जाते.( हा एक स्वतंत्र विषय असून पुढील भागांमध्ये त्याची चर्चा करूया ) त्याचप्रमाणे मूव्हींग एवरेज, MACD, स्टोकेस्टीक्स,पिवोट पोइंट, फिबोनासी लेवल्स अशा निरनिराळ्या इंडीकेटर्ससह RSI आणि W%R वापरले जातात.
अशा प्रकारे दोन्ही इंडीकेटर्सचा वापर विविध कालावधीसाठी आणि विविध पिरीअड घेवून, त्याचे उपलब्ध रेकोर्डच्या( Historic Charts) च्या आधारे येणारे निश्कर्ष तपासून त्यानंतर आपल्याला उत्तम रिझल्ट देणारे इतर इंडीकेटर्स मदतीला घेवून स्वत:चे असे एक "ट्रेड सेट-अप" किंवा "सिस्टीम" तयार करावी आणि त्या सिस्टीमच्या नियमांच्या आधारे स्टोपलोससह  मगच प्रत्यक्ष ट्रेडींगला सुरुवात करावी.
अचूकता ही अनुभवाने वाढते, आणि टेक्निकल इंडीकेटर्स वरून निश्कर्ष काढणे हे शास्त्र तर आहेच, पण त्याहीपेक्षा जास्त, ती अनुभवाने येणारी " कला " आहे हे जरूर नमूद करावेसे वाटते.

Read more »

१३ मार्च, २०११

मूव्हींग एवरेजेसचा ट्रेडींगमध्ये कसा वापर कराल..?

मित्रहो, 
वेळेच्या कमतरतेमुळे बर्याच दिवसांनी येथे लिखाण करत असलो तरी सर्वांना उपयोगी पडेल असे काहीतरी मराठीतून व सोप्या भाषेत उपलब्ध करताना नेहमीइतकेच समाधान होत आहे. हा माझा प्रयत्न वाचकांना उपयुक्त वाटेल अशी आशा आहे.
आजची ही पोस्ट , "तांत्रिक विश्लेषणाची ओळख" या लेखमालेचा पूढचा भाग म्हणूनही लिहीत आहे.
तांत्रिक विश्लेषणाची ओळख :भाग १३
मूव्हींग एवरेजेसचा ट्रेडींगमध्ये वापर-
टेक्निकल चार्ट पहाताना मूव्हींग एवरेजची किंमत कशी काढतात ते आपण यापूर्वी पाहिले आहेच, पण त्यापेक्षाही महत्वाचे त्याचा प्रत्यक्ष ट्रेडींगमध्ये कसा वापर करतात हे जाणून घेणे आहे.
मूव्हींग एवरेजचा सर्वात सोपा अर्थ म्हणजे एखाद्या शेअरची वा कमोडिटीची एखाद्या ठराविक काळापूरती सरासरी किंमत होय. हा ठराविक काळ किती असावा हे अर्थातच आपण ठरवायचे आहे.
गूगल वा याहू फायनान्स या साईटवर गेल्यास असे इन्टरएक्टीव्ह चार्ट्स उपलब्ध असतात.त्यामध्ये आपण इन्ट्राडे, ५ दिवस, महिना, ३महिने, ६ महिने, वर्ष, ५ वर्षे इ. विविध कालावधी निवडू शकतो.एकदा का आपला कालावधी नक्की झाला कि मग त्या चार्ट मध्ये किती पिरीअडची मूव्हींग एवरेजची रेषा काढायची हे ठरवावे लागते.
खालील आकृती पहा-

यामध्ये १० पिरीअड SMA आणि ३० पिरीअड EMA अशा दोन मूव्हींग एवरेजेस काढल्या आहेत.अर्थातच यातील १०SMA ही वेगात हालचाल करणारी आहे आणि ३०EMA  ही त्यामानाने कमी हालचाल दाखवते किंवा फारसे चढ-उतार दाखवत नाही. अशा प्रकारे दोन वेगळ्या प्रकारे वागणार्या लाईन्स घेतल्याने नक्की ट्रेन्ड काय आहे, तसेच तो रिव्हर्स होतो आहे का हे ओळखता येते.
सातत्याने वरखाली होणार्या शेअरच्या भावातील तात्पुरत्या चढ-उतारामुळे होणार्या दिशाभूलीवर उपाय म्हणून मूव्हींग एवरेज या कल्पनेचा जन्म झाला. थोडक्यात मूळ किंमतीच्या ग्राफमधील विचित्र वळणे टाळून त्याचेच एका गुळगुळीत (Smooth) रेषेमध्ये रुपांतर करण्यात आले.
आता अशा दोन वेगवेगळ्या मूव्हींग एवरेजेस पैकी वेगवान असलेली म्हणजेच १०SMA ही जेव्हा ३०EMA या रेषेला छेद देते तेव्हा ट्रेन्ड रिव्हर्स झाला असे ढोबळमानाने समजले जाते.
आकृतीत दाखवल्याप्रमाणे जेव्हा १०SMA ने ३०EMA ला खालून वरच्या दिशेस छेद दिला तेव्हा डाऊनट्रेन्ड संपून अपट्रेन्ड सुरू झाला असे समजतात.त्यानंतर मात्र जोपर्यंत पुन्हा वरून खालच्या दिशेस छेदले जात नाही तोपर्यंत अपट्रेन्ड कायम आहे असे समजण्यात येते.
म्हणजेच अपट्रेन्ड सुरू झाल्यावर खरेदी करून पुन्हा ट्रेन्ड रिव्हर्सल होईपर्यंत होणारा फायदा घेण्याचा प्रयत्न केला जातो.
जोपर्यंत १०SMA ही ३०EMA च्यावर राहिली आहे, तोपर्यंत Long position (खरेदी) चा विचार करावा आणि जर १०SMA ही ३०EMA च्या खाली असेल तर Short positions (विक्री अथवा शोर्टसेलींग) चा विचार करावा.
या पद्धतीने आपले निर्णय योग्य ठरण्याची शक्यता वाढते.
यापेक्षा अधिक सोपे काही असेल का ?
मात्र म्हणूनच कोणतीही पद्धत शेअरबाजारात १०० टक्के कधीच बरोबर नसते याचीही जाणीव ठेवायला हवी. मात्र अधिक अचूक निदान करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या पिरीअडच्या SMA व EMA चा वापर करून बघा. कुठले कोम्बिनेशन अधिक अचूक परिणाम देते तसेच आपल्या स्वत:च्या ट्रेडींग-स्टाईल ला चपखल बसते ते प्रत्येकाने पडताळून पहाणे गरजेचे आहे. तसेच डे-ट्रेड साठी इन्ट्राडे चार्ट वापरावा आणि शोर्ट टर्म साठी ५ दिवस,१ महिना, ३ महिने तसेच ६ महिने कालावधीचे चार्ट निवडून त्यावर विविध पिरीअडच्या मूव्हींग एवरेजेस कशा काम करतात हे पहायला हवे. कुठल्या पद्धतीने कमीतकमी चूकीचे सिग्नल (WHIPSAW) निर्माण होतात ते पडताळून ती पद्धत सातत्याने स्टोपलोस सहीत वापरल्याने फायद्याचे प्रमाण नक्कीच वाढेल.
१० व २६SMA , ८ व ३४EMA तसेच, २० व ५०SMA अशी विविध कोम्बिनेशन्स ट्रेडर्समध्ये लोकप्रिय आहेत.
यात खालील गोष्टी नियम म्हणून पाळाव्यात-
१) छोट्या पिरीअडची लाईन ही मोठ्या पिरीअडच्या लाईनपेक्षा वर असेल तरच खरेदीचा विचार.
२) दोन्ही एवरेजेस एकमेकांच्या फार जवळ नसाव्यात.
३) दोन्ही एवरेजेस या वरचे बाजूस जाणार्या म्हणजे चढत जाणार्या असाव्यात.

याव्यतिरिक्त आणखी एक सोपी व परिणामकारक पद्धत म्हणजे २१ किंवा ३४ या पिरीअडची एकच EMA लाईन काढून जेव्हा शेअरची किंमत ही EMA लाईनला खालून वरच्या दिशेस छेद देइल तेव्हा खरेदी व याउलट वरून खालच्या दिशेस छेद देइल तेव्हा शोर्टसेल करतात.
अशा प्रकारच्या ट्रेडींग मध्ये निर्णयाला अधिक बळकटी यावी म्हणून २०० SMA चा खालील प्रमाणे प्रभावी वापर करता येतो.-
२०० SMA ही लाईन काढून बुलीश विभाग आणि बेअरीश विभाग असे दोन भागांची कल्पना केली जाते. २००SMA ही मोठ्या पिरीअडची असल्याने ही फार चढ-उतार दाखवत नाही, या लाईनच्या खाली बेअरीश विभाग समजून जोपर्यंत शेअरची किंमत या विभागात आहे, तोपर्यंत वरील मूव्हींग एवरेजेस च्या कोम्बिनेशनने दिलेले विक्रीचे सिग्नल फक्त विचारात घेतले जातात.
याउलट २००SMA च्या वरच्या बाजूस म्हणजे बुलीश विभागात जर शेअरची किंमत असेल तर फक्त खरेदी सिग्नलच विचारात घेतले जातात.
२०० SMA रेषा ही कोणत्याही चार्टचे अविभाज्य अंग असावी असे महत्व तीला आहे.सातत्याने निरीक्षण कराल तर असे दिसून येइल कि शेअरची किंमत ही अनेक वेळेला या महत्वाच्या रेषेला स्पर्श करून परत फिरते.
 सर्व वाचकांना ही माहिती सोप्या भाषेत देण्याचा मी प्रयत्न केला आहे. तरीही काही शंका असेल तर जरूर COMMENT द्यावी.
WISH YOU ALL HAPPY TRADING....!


Read more »

३ जाने, २०११

तांत्रिक विश्लेषणाची ओळख- मागील सर्व भाग येथे उपलब्ध झाले आहेत.!

मित्रांनो,
गेले बरेच दिवस वेळेच्या कमतरतेमुळे लिखाण करू शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व !
मात्र याअगोदर ठरविल्याप्रमाणे आतापर्यंत फक्त या ब्लोगच्या सदस्यांनाच उपलब्ध असलेल्या "तांत्रिक विश्लेषणाची ओळख" चे आतापर्यंतचे सर्व भाग एकत्ररित्या तसेच सर्व वाचकांसाठी ब्लोगवरच उपलब्ध केले आहेत. ते मिळवण्यासाठी येथे क्लिक करा. किंवा ब्लोगच्या वरील भागात हेडींगच्या खाली असलेल्या TAB वर क्लिक करा.
तसेच यापूढील भागही तेथेच जोडले जातील.
आता गेल्या काही दिवसातल्या बाजाराविषयी...
गेल्या आठवड्यापर्यंत कन्सोलिडेट होत असलेल्या बाजाराने ५९५०, ६०५०, ६१२० अशा सर्व विरोध पातळ्या तोडत आगेकूच केली आहे. या अलिकडच्या तेजीत ओएनजीसी तसेच लारसनने भाग घेतलेला दिसत नाही, मात्र आयटी, बेंका च्या शेअरनी चांगली वाढ दाखवली आहे. भारती मध्येही हालचाल होत आहे. आज नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी बाजाराने उत्तम संकेत दिले आहेत. आता  निफ्टी ६३०० नजिक असलेली दिवाळी मुहुर्ताच्या वेळेस असलेली उच्च पातळी ओलांडतो कि तेथून परत फिरतो ते पाहूया. अर्थातच काही झाले तरी त्या पातळीच्या जवळपास (किंवा त्या आधीच) बाजारात विक्री होणार हे नक्की आहे, आणि आपणही तेव्हा काही विक्री करून फायदा घेणे आवश्यक आहे.

Read more »