Share/Bookmark

४ नोव्हें, २०१२

बीटा व्हॅल्यु - जोखमीचे प्रतिबिंब ?



बीटा व्हॅल्यु म्हणजे एखाद्या स्टॉकची वा पोर्टफोलिओची इंडेक्सच्या तुलनेतली वोलॅटिलिटी हे आपण मागील पोस्टमध्ये बघितले आहे, पण या बीटा व्हॅल्युचे महत्व नेमके काय ते आता पाहूया. १ पेक्षा जास्त बीटा व्हॅल्यु असलेले शेअर्स हे तुलनेने अधिक जोखमीचे असतात मात्र त्यामध्ये फायदा देण्याची क्षमताही जास्त असते, तसेच १ पेक्षा कमी बीटा व्हॅल्यु असलेल्या शेअर्समध्ये जोखीम कमी असली तरी परताव्याचे प्रमाणही कमी असते. तेव्हा एकप्रकारे बीटा व्हॅल्यु ही आपण घेतलेल्या जोखमीचे प्रतिबिंब असते असे म्हणायला हरकत नाही. त्याआधारे आपला पोर्टफोलिओ बांधताना मार्केटचा मूड बघून त्याप्रमाणे स्टॉक्सची निवड करता येते. बाजार किंवा इंडेक्स हा जेव्हा चढता ट्रेन्ड दाखवत असेल तेव्हा १ पेक्षा जास्त बीटा असणारे शेअर्स आपल्याजवळ असतील तर इंडेक्सपेक्षा जास्त प्रमाणात फायदा मिळविणे शक्य असते म्हणून तेव्हा बीटा अधिक असलेला म्हणजेच आक्रमक असा पोर्टफोलिओ बाळगला जातो, मात्र जेव्हा मार्केट चांगले नसेल तेव्हा १ पेक्षा कमी बीटा असलेले शेअर्स हे इंडेक्सच्या तुलनेत कमी घसरल्याने आपोआपच आपले नुकसान मर्यादीत ठेवतात म्हणून वाईट काळासाठी डीफेन्सिव्ह पोर्टफोलिओ बाळगला जातो. अर्थात बाजाराचा मूड वा ट्रेन्ड ओळखणे हा यातला महत्वाचा पण कठीण भाग आहे.
 बाजारातील बरेचसे शेअर्स हे पॉझिटीव्ह बीटा असलेले असतात म्हणजे कमी वा अधिक प्रमाणात पण ते इंडेक्सच्या दिशेनेच हालचाल करतात, तर काही थोडे शेअर्स विशेष हालचालच दाखवत नाहीत, त्यांची बीटा व्हॅल्यु ही शून्य वा जवळपास शून्य असते. बाजारात अगदी अपवादाने, शेअर्स असेही असू शकतात कि ते नीगेटीव्ह बीटा दाखवतात, म्हणजेच त्यांची हालचाल ही बाजाराच्या विरूद्ध असते, मात्र अशी नीगेटीव्ह बीटा व्हॅल्यु फार कमी काळ रहाते. असो. आपल्या दृष्टीने महत्वाचे हे आहे की मार्केटची दिशा ओळखण्याचा प्रयत्न करणे आणि त्यानुसार आपला पोर्टफोलिओ बांधणे !  
आता पोर्टफोलिओची बीटा व्हॅल्यु कशी काढतात ते बघुया.
समजा आपल्या पोर्टफोलिओसाठी खालीलप्रमाणे शेअर्स खरेदी केले आहेत-
१०० स्टेट बॅन्क - खरेदी रु.२०००
२०० रिलायन्स इंड.- खरेदी रु.८००
३०० हिंदु.युनिलीव्हर - खरेदी रु.५५०
५०० टाटा मोटर्स - खरेदी रु.२५०
वरीलप्रमाणे शेअर्स असलेल्या पोर्टफोलिओची बीटा व्हॅल्यु काढण्यासाठी या चारही शेअर्सचा बीटा माहीत करून घ्या.
समजा स्टेट बॅन्क-१.४९, रिलायन्स-१.१७, हिंदु.युनिलीव्हर-०.३२, आणि टाटा मोटर्स-१.६८ अशा लेटेस्ट बीटा व्हॅल्यु आहेत. तेव्हा -
स्टेट बॅन्क एकूण किं.१००*२००० =रु.२,००,०००. म्हणून २,००,०००*१.४९(बीटा) = २,९८,०००
रिलायन्स एकूण किं. २००*८००= रु.१,६०,०००. बीटा व्हॅल्यु = १,६०,०००*१.१७(बीटा) = १,८७,२००
हिंदु.युनिलीव्हर एकूण किं.३००*५०० = रु.१,५०,०००. बीटा व्हॅल्यु =१,५०,०००*०.३२(बीटा) = ४८,०००
टाटा मोटर्स एकूण किं.५००*२५० = रु.१,२५,०००. बीटा व्हॅल्यु = १,२५,०००*१.४८(बीटा) = १,८५,०००
वरील आकडेमोडीवरून सर्व शेअर्सची एकूण खरेदी किंमत ही रु.६,३५,००० होते, आणि बीटाने गुणल्यावर होणारा आकडा हा ७,१८,२०० एवढा होतो.
म्हणून वरील पोर्टफोलिओची बीटा व्हॅल्यु = ७१८२००/६३५००० = १.१३ एवढी होते. म्हणजे हा पोर्टफोलिओ इंडेक्सच्या तुलनेत अधिक हालचाल करत असल्याने इंडेक्स घसरला तर आपला पोर्टफोलिओ १.१३ पट अधिक घसरण्याचा संभव आहे. त्याचे हेजींग करण्यासाठी वरील पोर्टफोलिओची खरेदी किंमत ही ६,३५,००० असली तरी थिअरीप्रमाणे ७,१८,००० रु.ची रिवर्स पोझिशन अथवा तेवढ्या किंमतीचे फ्युचर्स सेल करावे लागतील.
(वरील सर्व किंमती काल्पनिक असून केवळ उदाहरणादाखल आहेत.)
अशा प्रकारे बीटा हा रिस्क मॅनेजमेन्टचा महत्वाचा भाग आहे. मात्र याबाबत काही गोष्टी लक्षांत घेणे आवश्यक आहे - उपलब्ध बीटा व्हॅल्यु ही गतकाळातील वोलॅटिलिटीवर आधारीत असते, तशी ती भविष्यात राहीलच अशी खात्री देता येत नाही. बाजाराचे वा शेअर्सचे फंडामेन्टल्स बदलल्यास, बीटा व्हॅल्यु त्या शेअरमधील रिस्कचे योग्य प्रतिबिंब दाखवत नाही. उदा. अतिशय कमी बीटा असलेल्या म्हणजेच साधारणपणे सुरक्षित मानल्या गेलेल्या कंपनीने एखाद्या जोखमीच्या क्षेत्रात नव्याने पदार्पण केले असेल तर उपलब्ध बीटा व्हॅल्यु ही त्या शेअरमधील गुंतवणूकीमधली रिस्क योग्यरीत्या दाखवत नाही. तसेच निरनिराळ्या कालावधीतील वोलॅटिलिटीवरून त्या त्या काळाची बीटा व्हॅल्यु ठरत असते, तेव्हा लॉन्गटर्म इन्वेस्टर्सनी वेळोवेळी बदलत्या बीटाची दखल घेणे आवश्यक आहे. काही शेअर्स हे बाजारात नवीन असतात. त्यांची बीटा व्हॅल्यु ही पूरेशा काळातील किंमती उपलब्ध नसल्याने विश्वासार्ह नसू शकतात.
समजा एखादा उत्तम फंडामेन्टल्स असलेला शेअर हा अचानक काही तात्कालिक कारणाने घसरला तर किंमतीमधील अशा मोठ्या हालचालीने त्याची बीटा व्हॅल्यु ही एकदम वाढलेली दिसेल, म्हणून त्या शेअरमधली जोखीमही वाढलेली आहे असा अर्थ नेहमीच काढता येइल का ? लॉन्गटर्म किंवा ज्यांना व्हॅल्यु इन्वेस्टर म्हणतात त्यांच्यामते तर अशा वेळी हा उत्तम शेअर अत्यंत कमी किंमतीला उपलब्ध असतो, म्हणजे त्यात रिस्क कमी असते !
सारांश हा कि तात्कालिक कारणाने निर्माण झालेली शॉर्टटर्म रिस्क -जेथे त्या कालावधीतील बीटा किंवा वोलॅटिलिटी ही अतिशय महत्वाची ठरते, - आणि लॉन्गटर्म रिस्क – जेथे फंडामेन्टल्स हे अधिक महत्वाचे असतात - यातील फरक समजून घेणे महत्वाचे आहे. जास्त बीटा हा शॉर्टटर्म साठी जोखीम दर्शवत असला तरी लॉन्गटर्म गुंतवणूकीसाठी ती एक दूर्मिळ संधीही असू शकते !

Read more »