Share/Bookmark

२९ डिसें, २०१२

ऑप्शन्स (भाग ३)- ईन द मनी, आऊट ऑफ द मनी म्हणजे काय ?



मागील पोस्टमध्ये दिलेल्या NSE च्या वेबसाईटवरील पेजचाच संदर्भ घेवून आपण आज चर्चा करणार आहोत. तेव्हा कृपया येथे क्लिक करा व ते पेज उघडा. डाव्या बाजूला कॉल व उजव्या बाजूला पुट च्या किंमती आहेत.
आता प्रथम डावीकडील ‘कॉल्स’ विभागाकडे पहा. आजच्या निफ्टीच्या किंमतीपेक्षा (उदा.५९००) कमी स्ट्राईक प्राईज असलेल्या ऑप्शन्सच्या किंमती या तांबूस रंगाने दाखविल्या आहेत. तसेच स्ट्राईक प्राईज जेवढी कमी (उदा. ५८००, ५७०० इ.) होत जाते तेवढ्या प्रमाणात त्या कॉल ऑप्शनची किंमत वाढत जाते हे आपल्या लक्षांत येईल. या उलट आजच्या निफ्टीच्या किंमतीपेक्षा जास्त स्ट्राईक प्राईजच्या म्हणजेस पांढ-या रंगाने दाखविलेल्या विभागात, स्ट्राईक प्राईज जेवढी जास्त असेल (उदा. ६०००, ६१०० इ.) तेवढ्या प्रमाणात त्या कॉल ऑप्शन्सच्या किंमती या कमी होत गेलेल्या दिसतील.
याचा अर्थ असा, कि निफ्टी ५९०० वा जवळपास असताना ६१०० स्ट्राईक प्राईजचा कॉल ऑप्शन हा ६००० च्या कॉल पेक्षा स्वस्त असतो कारण या महिन्याच्या( उदा. जानेवारी ’१३ सिरीज) मुदतीत निफ्टीने ६००० ची पातळी ओलांडण्याची जी शक्यता असते, त्यापेक्षा ६१०० ची पातळी ओलांडण्याची शक्यता ही थोडी कमी असते. म्हणजेच जर मी आज ६०००चा कॉल खरेदी केला तर माझ्या फायद्याची शक्यता, ही ६१०० चा कॉल खरेदी करणा-यापेक्षा जास्त असेल व म्हणूनच ६००० च्या कॉलची किंमत (प्रिमिअम वा हमी रक्कम) मला जास्त द्यावी लागेल. ६१०० वा ६२००, ६३०० वा त्यापुढचे कॉल हे अधिकाधिक स्वस्त मिळत असतील, मात्र  महिन्याच्या मुदतीत निफ्टी तेथपर्यंत जायची शक्यता कमी असल्याने असे स्वस्त कॉल खरेदी केल्यास फायदा मिळण्याची शकयताही कमी कमी होत जाईल. अर्थात जर निफ्टी ५९०० असताना जर ६२०० चा कॉल खरेदी केला असेल आणि जर निफ्टी हा अल्प मुदतीत ६१०० जरी झाला तरी ६२०० च्या कॉलची किंमत वाढल्याने तो विकून फायदा होणे शक्य असते. मात्र निफ्टी किती काळात आणि किती मोठी हालचाल करतो या दोन्ही गोष्टींवर सारे अवलंबून असते.
अशा प्रकारच्या अंडरलाईंगच्या च्या भावापेक्षा जास्त किंमतीच्या स्ट्राईक प्राईजच्या कॉल ऑप्शन्स ना ‘आऊट ऑफ द मनी’ कॉल ऑप्शन्स (OTM) म्हणतात. ते जेवढे अधिक ‘आऊट ऑफ द मनी’ असतील तेवढे स्वस्त असतील.
 निफ्टीच्या आजच्या भावापेक्षा कमी स्ट्राईक प्राईजच्या म्हणजेच ५८००, ५६०० इ. च्या ऑप्शनच्या किंमती या वाढत गेलेल्या दिसतील. कारण सध्या ५९०० ला मार्केटमध्ये मिळत असलेला निफ्टी, हा फक्त ५६०० मध्येच खरेदी करण्याचा हक्क हा महाग असणारच ! समजा मी असा ५६०० चा कॉल खरेदी केला आणि तो लगेच एक्सरसाईज केला तर मला लगेचच आणि हमखास असा ३०० रु. चा फायदा होईल. आणि म्हणूनच अशा अंडरलाईंगच्या किंमतीपेक्षा स्ट्राईक प्राईज कमी असलेल्या कॉल ऑप्शन्सना ‘इन द मनी’ (ITM) कॉल ऑप्शन असे म्हणतात. असे ITM कॉल ऑप्शन हे जेवढे अधिक ‘इन द मनी’ असतील तेवढे महाग असतील.
आता उजव्या बाजूला असलेल्या पुट विभागावर लक्ष द्या. निफ्टीच्या किंमतीपेक्षा कमी स्ट्राईक प्राईजच्या पुट ऑप्शनच्या किंमती या पांढ-या रंगाने दाखविल्या आहेत. तर निफ्टीच्या किंमतीपेक्षा जास्त स्ट्राईक प्राईज असलेल्या ऑप्शनच्या किंमती या तांबूस रंगाने दाखविल्या आहेत.
अंडरलाईंगच्या किंमतीपेक्षा कमी स्ट्राईक प्राईज असलेल्या पुट ऑप्शनना ‘आऊट ऑफ द मनी’ (OTM) पुट ऑप्शन म्हणतात. असे OTM पुट ऑप्शन, हे जेवढे ‘आऊट ऑफ मनी’ असतील म्हणजेच अंडरलाईंग प्राईजपेक्षा यांची स्ट्राईक प्राईज ही जेवढी कमी असेल तेवढे हे स्वस्त होत गेलेले दिसतील.
याउलट तांबूस रंगाने दाखविलेले पुट ऑप्शन ज्यांची स्ट्राईक प्राईज ही अंडरलाईंगच्या किंमतीपेक्षा जास्त आहे हे ‘इन द मनी’ म्हणजेच ITM पुट ऑप्शन्स आहेत. हे जेवढे ‘इन द मनी’ असतील तेवढी यांची किंमत ही जास्त होत गेलेली दिसेल. असे ITM पुट ऑप्शन खरेदी केल्यावर लगेच एक्सरसाईज केले तर हमखास फायद्याचे ठरतील. (अर्थात NSE ने युरोपिअन ऑप्शन पद्धती स्वीकारल्याने अशा प्रकारे ऑप्शन केव्हाही एक्सरसाईज करणे शक्य नसून हल्ली फक्त शेवट्च्या गुरुवारी शक्य असेल हे आपण पूर्वी बघितले आहे. अमेरिकन पद्धतीप्रमाणे ऑप्शन्स हे कोणत्याही दिवशी एक्सरसाईज करता येतात. मात्र आपल्याकडे जाने.’११ पासून फक्त युरोपिअन पद्धती आहे.)
याव्यतिरिक्त अंडरलाईंगच्या किंमतीएवढ्याच स्ट्राईक प्राईजचे ऑप्शन हे ‘ऍट द मनी’ (ATM) ऑप्शन्स या नावाने ओळखले जातात. उदा. निफ्टी ५९०० वा जवळपास असताना ५९०० स्ट्राईक प्राईजचे ऑप्शन्स हे ‘ऍट द मनी ऑप्शन’ असतात.   
कोणत्याही ऑप्शनची किंमत ही त्याच्या स्ट्राईक प्राईज व्यतिरिक्त त्याच्या शिल्लक मुदतीवरही अवलंबून असते व ही मुदत जशी संपत जाईल तशी ऑप्शनची किंमत कमी होत जाते.
उदा. समजा मी निफ्टीची किंमत ५९०० असताना ६००० चा म्हणजेच OTM कॉल खरेदी केला आणि लगेचच एक्सरसाईज केला तर ? पण निफ्टी मार्केटमध्ये ५९०० ला मिळत असताना तो ६०००ला घेण्याचा हक्क बजावणे तोट्याचे म्हणजेच निरर्थक ठरते ! म्हणजे या OTM कॉल ऑप्शनला तात्काळ मिळणारी अशी स्वतःची अंगभूत किंमत नाहीच. म्हणजेच अशा OTM कॉल ऑप्शनची किंमत ही त्याच्या टाईम व्हॅल्युवर म्हणजे शिल्लक मुदतीवर अवलंबून असते.
याचप्रमाणे निफ्टी ५९०० असताना मी ५८००चा OTM पुट खरेदी केला आणि लगेच एक्सरसाईज केला तर ते निरर्थक ठरते. म्हणजेच OTM पुट ऑप्शनलाही अंगभूत किंमत नसते आणि अशा OTM पुटची किंमत ही सुद्धा त्याच्या टाईम वॅल्युवर म्हणजेच शिल्लक मुदतीवर अवलंबून असते.
मग प्रश्न असा येतो कि अशा अंगभूत किंमतच नसलेल्या OTM ऑप्शनना बाजारात किंमत का असते ? ते बाजारात ट्रेड का केले जातात ?
 याचे कारण असे कि OTM कॉल वा पुट हे ‘आज’ एक्सरसाईज करणे निरर्थक असले तरी ते मुदतीच्या शेवटी एक्सरसाईज करताना अंडरलाईंगची किंमत बदलल्याने फायदेशीर ठरण्याची शक्यता असते. उदा. निफ्टी ५९०० असताना घेतलेला ६००० चा कॉल हा त्या क्षणी ‘आऊट ऑफ मनी’ असल्याने त्याची अंगभूत किंमत शून्य असली, तरी दिलेल्या मुदतीमध्ये जर निफ्टी ६०५० एवढा वाढला तर मात्र तो आपोआपच ‘इन द मनी’ कॉल होईल व त्याची अंगभूत किंमत वाढेल. किंवा मुदतीपूर्वीच निफ्टी ५९८० एवढा जर झाला तरी ६०००च्या कॉल ऑप्शनची किंमत वाढल्याने तो विकून फायदा होवू शकतो. अशा परिस्थितीत तो शेवटच्या गुरुवारी एक्सरसाईज करणे किंवा केव्हाही विकून फायदा घेणे शक्य असते. मात्र निफ्टी किती काळात आणि किती मोठी हालचाल करतो या दोन्ही गोष्टींवर सारे अवलंबून असते.
अशा प्रकारे ठराविक मुदतीत होवू शकणा-या (संभाव्य) फायद्याच्या शक्यतेमुळेच आऊट ऑफ मनी (कॉल वा पुट) ऑप्शन्सना ‘टाईम व्हॅल्यु’ असते व त्यामुळेच स्वतःची अंगभूत किंमत नसूनही त्यांना बाजारात किंमत असते.
म्हणून आपण असे म्हणू शकतो कि –
ऑप्शनची बाजारातील किंमत = (अंगभूत किंमत Intrinsic Value + शिल्लक मुदतीवर ठरणारी किंमतTime Value).
 

Read more »

१९ डिसें, २०१२

ऑप्शन्स (भाग २)-'कॉल' आणि 'पुट' म्हणजे काय ?



‘ऑप्शन’ म्हणजे मराठीत ‘पर्याय’ ! आता या ऑप्शन्स मध्ये ‘कॉल’ आणि ‘पुट’ हे दोन पर्याय आहेत. आपण यापूर्वीच्या पोस्टमधील उदाहरणात बघितले कि मी टीव्ही खरेदीच्या बाबतीत, १०००रु. हमी रक्कम भरून ठराविक किंमतीला टीव्ही खरेदीचा हक्क ठराविक काळासाठी विकत घेतला होता. हा मी स्वीकारलेला पर्याय म्हणजेच ‘कॉल ऑप्शन’ होय ! आता त्या उदाहरणातील सर्व घटकांचा अर्थ आपण मार्केटच्या संदर्भात बघुया म्हणजे पुढचे सारे समजून घ्यायला सोपे होइल.

टीव्ही – म्हणजे ज्या वस्तूच्या संदर्भातला सौदा आहे ‘ती’ म्हणजेच ‘Underlying’ – इंडेक्स वा एखादा स्टॉक वा कमॉडिटी.

मी- टीव्हीचा खरेदीदार वा तशी हमी घेणारा – म्हणजेच रक्कम देवून ‘कॉल ऑप्शन’ खरेदी करणारा – ‘कॉल बायर’.

विक्रेता – हा हमी देणारा व बदल्यात रक्कम स्वीकारणारा – म्हणजेच ‘कॉल ऑप्शन’ विकणारा किंवा ‘कॉल सेलर’ वा ‘Call Writer’ – प्रत्यक्षात मात्र स्टॉक (वा कमॉडिटी) एक्स्चेन्ज हे कॉल बायर व सेलर यांच्यामधील दुवा असते. जसे शेअर खरेदी-विक्रीच्या बाबतीत असते तसेच.

हमी रक्कम – याला ‘प्रिमिअम’ असे म्हणतात. ही त्या कॉल ऑप्शनची त्यावेळची किंमत असते.- लक्षात घ्या कि सदर करार संपायला जास्त काळ असेल तर तेवढा हा प्रिमिअम जास्त असेल, व (टीव्हीच्या किंमतीत विशेष वाढ न झाल्यास वा घट झाल्यास) काळ संपत जाईल तसा तो कमी कमी होत जाईल. शेवटच्या दिवशी हा प्रिमिअम म्हणजेच ऑप्शनची किंमत ही शून्य म्हणजेच हे कॉल ऑप्शन ‘Worthless’ होईल. अशा काळानुसार कमी होणा-या ऑप्शनच्या प्रिमिअमला ‘Time Decay’ असे म्हणतात. ‘टाईम डीके’ ही संकल्पना नीट लक्षांत घ्या, कारण ऑप्शन ट्रेडींगमध्ये याला अतिशय महत्व आहे. त्याविषयी नंतर पाहणारच आहोत.

एक महिन्याची मुदत – जसे फ्युचर्स व्यवहाराच्या बाबतीत आपण पूर्वी बघितले कि चालू महिना, पुढील महिना व त्यापुढील महिना या काळासाठी फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट केली जातात तशीच ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्टही तीन महिन्यासाठी ट्रेड केली जातात, तसेच प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी त्या महिन्याच्या सिरीजची एक्स्पायरी असते. अर्थातच चालू महिन्याच्या ऑप्शनचे प्रिमिअम हे पुढील महिन्याच्या ऑप्शनच्या प्रिमिअमच्या तुलनेत स्वस्त असतात आणि त्यांचा वॉल्युमही चांगला असतो. उदा. निफ्टी डिसेंबर कॉल ऑप्शन हा, जानेवारी कॉल ऑप्शनपेक्षा स्वस्त असतो. दोन महिन्याच्या कालावधीसाठी मी जर टीव्ही विक्रेत्याला हमी मगितली तर तो जास्त प्रिमिअम घेणार कारण जास्त काळामध्ये टीव्हीच्या किंमतीत बदल होण्याची शक्यताही जास्त असेल.

कराराची पूर्तता – सदर हमी रक्कम भरून केलेल्या कराराप्रमाणे मी जर तो टीव्ही मुदतीच्या आत खरेदी केला तर या कराराची पूर्तता झाली, म्हणजेच मार्केटच्या भाषेत म्हणायचे तर सदर ‘कॉल ऑप्शन एक्सरसाईझ’ केला गेला. आपल्याकडे निफ्टी वा स्टॉकच्या बाबतीतले असे ‘एक्सरसाईझ’ हे (जाने.’११ पासून) फक्त शेवटच्या गुरुवारी करता येते. म्हणजेच सदर ‘Underlying’ (निफ्टी वा स्टॉक) ठरलेल्या किंमतीत खरेदी करता येतो. त्या ‘Underlying’ ची बाजारात त्या दिवशी जी किंमत असेल त्यावर कॉल एक्सरसाईझ करणाराचा फायदा वा तोटा ठरतो.

हमी पावती अन्य व्यक्तीस विकणे – समजा मी टीव्ही खरेदी न करता ती हमीची पावती अन्य व्यक्तीस विकली तर मी माझा ‘कॉल’ हा विकून टाकला असे होते. दरम्यान ‘Underlying’ ची किंमत वाढली असेल तर कॉल ऑप्शनची किंमतही वाढेल म्हणजेच असा कॉल ऑप्शन ‘घेवून विकणा-याचा’ फायदा होईल मात्र ‘Underlying’ ची किंमत कमी झाली असेल किंवा ती स्थिर राहिली वा पूरेशी वाढली नसेल तर मात्र कॉल ऑप्शनची बाजारातील किंमत कमी झाल्याने तोटा होईल. असे ऑप्शन ट्रेड हे मात्र त्या काळातील कोणत्याही दिवशी करता येते.

समजा मी टीव्ही खरेदीही केला नाही व ती हमीची पावती म्हणजेच घेतलेला कॉल ऑप्शन मुदत संपेपर्यंत विकलाही नाही, तर आपोआपच त्याची किंमत कमी कमी होत जावून शून्य होईल आणि एक्स्पायरीच्या दिवशी तो आपोआप स्क्वेअर-अप होईल. मात्र दरम्यानच्या काळात  ‘Underlying’ ची किंमत भरपूर वाढली असेल तर मात्र त्या कॉल ऑप्शनची किंमत वाढली असल्याने किंमतीतल्या फरकाएवढा फायदा मला मिळेल.

निफ्टीच्या बाबतीत असे ऑप्शन ट्रेडींगचे व्यवहार करून विविध मार्केट कंडीशन्समध्ये फायदा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. निफ्टीचा एक लॉट ५० चा असल्याने, बाजारातील ऑप्शनची किंमत १०रु. असेल तर ५००रु इतका प्रिमिअम भरून आपल्याला एक लॉट खरेदी करता येतो. ऑप्शनच्या विक्रीविषयी आपण नंतर माहिती घेणारच आहोत.

ही झाली ‘कॉल ऑप्शन’ विषयी माहिती. आता ‘पुट ऑप्शन’ म्हणजे काय ते बघुया.

समजा मी एक शेतकरी असून सुमारे महिन्यानंतर पिकणारे धान्य मला दुकानदाराला विकायचे आहे. वरील टीव्हीच्या उदाहरणाप्रमाणेच एका महिन्याच्या मुदतीत एका ठराविक( स्ट्राईक प्राईज वा एक्सरसाईझ प्राईज) किंमतीत एक धान्याचे पोते त्याला विकण्याचा हक्क मी खरेदी करू शकतो. या वर्षी पीक उत्तम आल्याने धान्याच्या किंमती कमी होणार अशी माझी अपेक्षा आहे. त्यामुळे मी आज असा करार करून ठेवतो. महिनाअखेर धान्याच्या किंमती उतरल्या तर हा ‘विक्रीचा हक्क’ खरेदी करून ठेवल्याने मला आजच्या भावानेच विक्री करता येइल, किंवा धान्याच्या किंमती उतरल्याने माझ्या या हमी पावतीची किंमत वाढेल व तशा स्थितीत प्रत्यक्ष धान्य न विकता मी तो हक्क अन्य शेतक-याला विकूनही फायदा कमवू शकेन. म्हणजेच येथे ‘धान्य’ या ‘Underlying’ चा विक्री करण्याचा हक्क म्हणजे ‘पुट ऑप्शन’ मी खरेदी केला व परिस्थितीनुसार प्रत्यक्ष धान्याची विक्री करून किंवा हा पुट ऑप्शन विकून मी फायदा कमवला. अर्थात माझ्या अपेक्षेनुसार धान्याच्या किंमती कमी झाल्या नाहीत, वा स्थिर राहिल्या, वा वाढल्या तर माझ्या पुट ऑप्शनची किंमत कमी होत जाईल जसे कि आधीच्या टीव्हीच्या उदाहरणात, कॉल ऑप्शनच्या बाबत आपण पाहिले.

या दोन्ही उदाहरणावरून असा निश्कर्ष निघतो कि कॉल व पुट या दोन्ही ऑप्शनच्या बाबतीत जो खरेदीदार (बायर) असतो त्याला प्रिमिअम भरावा लागतो, मात्र कॉन्ट्रॅक्ट पूर्ण (एक्सरसाईझ) करायचे कि नाही हे तो ठरवू शकतो. याउलट करार लिहून देणारास म्हणजेच कॉल वा पुट ऑप्शनची विक्री करणारास (सेलर वा रायटर) करार पाळणे बंधनकारक असते आणि त्याबदल्यात त्याला प्रिमिअमच्या रकमेचा लाभ होणार असतो. यात हे महत्वाचे आहे कि ‘Underlying’ ची किंमत ठरलेल्या काळात वाढेल कि कमी होईल याचा अंदाज ज्याला आला तो फायदा कमवेल. निफ्टीच्या बाबतीत असे कॉल व पुट हे दोन्ही ऑप्शन्स, खरेदी-विक्री करण्याचे केन्द्र म्हणजे स्टॉक एक्सचेन्ज असून ते ऑप्शन बायर व सेलर यामधील दुवा असते. या माध्यमातून ज्या ट्रेडरला निफ्टी वा बाजार वाढेल असे वाटते त्याने ‘कॉल’ खरेदी करणे अपेक्षीत आहे तर ज्याला तो पडेल असे वाटते त्याने ‘पुट’ खरेदी करणे अपेक्षीत आहे. वरील उदाहरणात ‘आजचा भाव’ ही एकच स्ट्राईक प्राईज असली तरी प्रत्यक्बाजारात निफ्टीच्या दर १०० पॉइन्ट्च्या अंतराने अनेक स्ट्राईक प्राईज उपलब्ध असतात. यातील कोणत्याही स्ट्राईक प्राईजचे ऑप्शन्स आपण खरेदी-विक्री करू शकतो. NSE च्या वेबसाईट वर, तसेच आपण ऑनलाईन टर्मिनल वापरत असाल तर त्यावरही निफ्टी वा अन्य इंडेक्स आणि स्टॉकच्या सर्व स्ट्राईक प्राईजच्या कॉल व पुटच्या सध्याच्या किंमती आपण LIVE बघु शकतो. निफ्टी ऑप्शन्सचा बाजारातील वॉल्युम चांगला असतो, मात्र इतर इंडेक्सचा व काही स्टॉक्स सोडल्यास स्टॉक ऑप्शन्सचा वॉल्युम तुलनेने कमी असतो. निफ्टी ऑप्शन्सच्या NSE वरील किंमती पहाण्यासाठी येथे क्लिक करा. याच पेजवर वरील बाजूस असलेल्या पर्यायांचा वापर करून आपण निफ्टी, इतर इंडेक्स वा स्टॉक यातील निवड करू शकतो तसेच चालू, तसेच पुढील वा त्यापुढील महिन्याची ऑप्शन कॉन्ट्रॅक्टही आपण येथे बघू शकतो.

मध्यभागी असलेल्या कॉलममध्ये निफ्टीच्या सध्याच्या किंमतीच्या वरील व खालील बाजूस १०० पोइंट्सच्या  अंतराने असलेल्या विवि स्ट्राईक प्राईज दिसत आहेत, तसेच डावीकडे 'कॉल' व उजवीकडे 'पुट'च्या किंमती दिसत आहेत. मार्केट चालू असताना रिफ्रेश बटन दाबून आपण ही माहिती अपडेट करू शकतो. कॉल आणि पुटच्या किंमती या निफ्टीच्या सध्याच्या किंमतीच्या दोन्ही बाजूस कशा क्रमाने कमी वा जास्त होत गेल्या आहेत हे नीट पहा. तसेच तांबूस व पांढ-या रंगाने या पेजचे पडलेले विभाग लक्षांत घ्या. यावरून काही अंदाज,आडाखे बांधण्याचा प्रयत्न करा. पुढील पोस्टमध्ये या बाबतीतली सविस्तर माहिती येणारच आहे, तोपर्यंत थोडा सेल्फ स्टडी आणि जमल्यास या ब्लॉगला लाईक करा !!


Read more »

११ डिसें, २०१२

"ऑप्शन्स (भाग १)" - असंख्य पर्याय, अविरत संधी !



ब-याच दिवसांपासून काही वाचकांनी कॉल व पुट याविषयी माहिती देण्याची विनंती येथे केली होती. शेअरबाजारात गुंतवणूकीला सुरुवात करताना साधारणपणे म्युचुअल फंडापासून सुरुवात करून मग इक्विटी, ऑप्शन्स व नंतर शेवटी फ्युचर्स अशा क्रमाने जाण्याचा सल्ला दिला जातो. कमीतकमी धोका पत्करत पुढे जाण्याच्या दृष्टीने हा क्रम ठीक असला तरी बाजाराविषयीची समज व वाढत जाणारे भान या दृष्टीने ऑप्शन्स हे शेवटी येतात असे मला वाटते.

माझ्या मते इक्विटी, फ्युचर्स आणि निरनिराळ्या ट्रेडींग स्ट्रेटेजीज यांचा काही वर्ष भलाबुरा अनुभव घेतल्यावर, बाजाराचा एक वेगळा अंदाज येत जातो, तसेच अशी एक स्थिती येते कि बाजाराच्या शॉर्टटर्म मूव्हमेन्टविषयी एक प्रकारची उदासीनता वा स्थितप्रज्ञता येत जाते. बाजाराची उसळी वा तीव्र घसरण यांचे विशेष काही वाटेनासे होते. याचा अर्थ असा नव्हे कि अशा अनपेक्षीत हालचालींमुळे नुकसान होत नाही, मात्र अशा हालचाली गृहीत धरून, "सरावाने, अनुभवाने कुठल्याही परिस्थितीत नियमीतपणे फायदा उठवता आला तर किती बरे !' असे काहीसे विचार मनात येवू लागतात. त्यासाठी काही स्पेशल स्ट्रॅटेजी शोधण्याचा मन प्रयत्न करू लागतं ....

-मित्रांनो, मग हीच ती वेळ असते- "ऑप्शन्स.." या असंख्य पर्याय, अविरत संधी असणा-या अनोख्या क्षेत्राची ओळख करून घेण्याची !

ऑप्शन्स या एका मोठ्या विषयाला हात घालताना - मी अशी ओळख कितपत नीटपणे करून देवू शकेन याची मनात शंका आहे, मात्र आपणां सर्वांच्या पाठिंब्यावर हळू हळू हे जमेल असा विश्वासही आहे.

  हे एक चांगले काम असल्याने ते सुरु करायला मुहुर्ताची वाट न पहाता आजच ते सुरु करत आहे. चांगले काम असे म्हणण्याचे कारण शेअरबाजारात ख-या अर्थाने एक कसलेला ट्रेडर व्हायचे असेल तर ऑप्शन्स समजून घेवून त्यामध्ये प्राविण्य मिळवणे गरजेचे आहे. असे प्राविण्य मिळवलेत कि उतारवयात, हातपाय थकल्यावरही तुम्ही नियमीत कमाई करू शकाल ! एवढेच नव्हे तर तुमचा नातु तुम्हाला सल्ला विचारत राहील, रिटायर्ड असलात तरी कमावते असाल, आणि घरातला तुमचा मान कधीही कमी होणार नाही !

असो. प्रथम ऑप्शनची व्याख्या काय आहे हे बघुन मग सविस्तर माहिती घेवूया.

ऑप्शनची व्याख्या – ऑप्शन म्हणजे एक असे कॉन्ट्रॅक्ट वा करार आहे, कि जे लिहून देणारा (Seller or Writer) हा, ते कॉन्ट्रॅक्ट खरेदी करणा-यास (Buyer) एखादी ठराविक वस्तू किंवा मालमत्ता (Underlying), ठराविक किंमतीत (Strike price or Exercize price), ठराविक मुदतीपर्यंत, (कॉल ऑप्शनच्या बाबतीत) खरेदी करण्याचा, वा (पुट ऑप्शनच्या बाबतीत) विक्री करण्याचा हक्क(Right) देतो, मात्र कॉन्ट्रॅक्टनुसार तशी खरेदी/विक्री करण्याचे बंधन (Obligation) मात्र खरेदी करणा-यावर नसते.

या हक्काच्या(Right) बदल्यात असे ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट लिहून देणा-यास (Writer) ते खरेदी करणा-याकडून (Buyer) काही रक्कम (Premium) अदा केली जाते आणि बदल्यात ते कॉन्ट्रॅक्ट पाळण्याचे बंधन मात्र विक्री करणा-यावर रहाते.

या व्याख्येवरून सारे काही स्पष्ट होणार नाही, म्हणून एक उदा. घेवून मी नंतर स्पष्ट करेनच, मात्र तूर्त एवढेच लक्षांत घ्या कि - ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट खरेदी करणाराला प्रिमियम भरावा लागतो पण त्याच्यावर ते कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करणे बंधनकारक नसते, याउलट ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट विक्री करणारा हा प्रिमियमची रक्कम मिळवत असतो, मात्र त्याच्यावर ते कॉन्ट्रॅक्ट पाळणे बंधनकारक असते.



ऑप्शन्सचे वेगळेपण-

१) ऑप्शन्स हे मुख्यत्वे हेजींगसाठी वापरले जात असले तरी एक स्वतंत्र ट्रेडींग स्ट्रॅटेजी म्हणूनही वापरता येतात.

२) आपले नुकसान मर्यादीत ठेवण्याची उपजतच सोय असणारे ऑप्शन्स हे इन्स्ट्रुमेन्ट आहे. म्हणजे वेगळा स्टॉपलॉस लावण्याची गरज (ऑप्शन्स खरेदी करणा-यांना) पडत नाही.

३) अमर्यादीत फायदा तसेच अमर्यादीत तोटा अशा दोन्ही वैशिष्ट्यांमुळे योग्य काळजी घेतल्यास अफाट संधी.

४) बाजाराची दिशा कुठलीही असली तरी फायद्याच्या संधी नेहमी उपलब्ध.

५) फ्युचर्सच्या तुलनेत कमी मार्जिनमध्ये इंडेक्स ट्रेड करण्याची क्षमता.

६) ऑप्शन्सची विक्री (Writing) करून थोडा पण नियमीत फायदा मिळवण्याची संधी.



 आता एका उदाहरणाने ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय ते नीट समजून घेवूया. समजा मला एक टीव्ही खरेदी करायचा आहे. मी चौकशीसाठी एका शोरूममध्ये जातो आणि एक ठराविक मॉडेल सिलेक्ट करतो. त्याची किंमत रु.२०,००० आहे, मात्र येत्या काही दिवसांत टीव्हीच्या किंमती उतरणार असल्याचे मी ऐकले आहे, त्यामुळे मी लगेच खरेदी न करता विक्रेत्याला सांगतो कि मी थोड्या दिवसांनी येतो आणि टीव्ही खरेदी करून घेवून जातो. त्यावर तो विक्रेता म्हणतो कि साहेब, थोड्या दिवसांनी आलात तर चालेल, मात्र हे मॉडेल तेव्हा उपलब्ध असेलच असे नाही तसेच किंमती वाढल्या तर तुम्हाला त्या दिवशी असलेली किंमत द्यावी लागेल. मला तर हेच मॉडेल आवडले आहे आणि खरेदी तर आता करायची नाही, तर उतरलेल्या किंमतीत नंतर करायची आहे, मात्र विक्रेत्याच्या म्हणण्यानुसार किंमती वाढण्याचीही शक्यता आहे. ;-) त्यामुळे मी विचारात पडलो.

   शेवटी तो विक्रेता एक पर्याय माझ्यापुढे ठेवतो तो असा - या महिना अखेरपर्यंत तो माझ्यासाठी हे मॉडेल याच किंमतीत राखून ठेवायला तयार आहे, मात्र त्याबदल्यात मी हमी म्हणून त्याला १००० रु. द्यावेत. म्हणजे मी आत्ता फक्त १०००रु. भरून या महिनाअखेर पर्यंत ते मॉडेल त्याच किंमतीत खरेदी करण्याचा हक्क विकत घ्यायचा आहे !

मग असे १०००रु.भरून मी त्याच्याकडून करार करून पावती घेतली. त्यानुसार या महिन्याच्या अखेरपर्यंत कधीही मी जर त्याच्याकडे गेलो, तर त्याने दरम्यानच्या काळात टीव्हीच्या किंमती अगदी कितीही वाढल्या असल्या तरी ते मॉडेल मला २०,०००रु. मध्येच देणे त्याच्यावर बंधनकारक आहे. म्हणजे असा करार केल्याने २२,०००रु.चा टीव्ही मला २०,०००रु.तच मिळणार आहे. याउलट जर मी त्या मुदतीत त्याच्याकडे गेलो नाही तर सदर हमीचे १०००रु. हे त्याला मिळणार आहेत.

पण समजा महिनाभरात टीव्हीच्या किंमती २०००रु.ने उतरल्या तर? तर मी त्याच्याकडे जायचे कारणच उरणार नाही, कारण दुस-या दुकानातून मला तो टीव्ही १८,०००रु.तच घेता येइल. म्हणजे त्याला दिलेले हमीचे १०००रु. वजा जावूनही मला १०००रु. फायदा मिळेल.

आता एक शक्यता विचारात घ्या- समजा महिना पुरा होण्याआधीच टीव्हीच्या किंमती २०००रु.ने वाढल्या आहेत, पण दरम्यान मला टीव्ही घ्यायचा विचार काही कारणाने रद्द करावा लागला तर ? अशा वेळी १०००रु.हमी रक्कम भरून मी मिळवलेला २०,०००रु.त टीव्ही खरेदीचा हक्क फुकट जाईल कि नाही ?

पण दरम्यान माझ्या ओळखीच्या एका माणसालाही टीव्ही घ्यायचा असल्याचे मला कळल्याने मी ती हमीची पावती त्याला थोड्या कमी पैशात उदा. ७००रु.त विकून टाकतो. आता ती पावती घेवून त्या हमीनुसार तो माणूस त्या शोरूममध्ये तो २२,०००रु.चा टीव्ही २०,०००रु. मध्ये घेवू शकेल ! अशा प्रकारे त्या माणसाचे १३००रु. वाचले, तर माझ्या हमी रकमेपैकी निदान ७००रु. मला परत मिळाले.

आणखी काही शक्यता- समजा मला टीव्ही घेणे रद्द करावे लागले आणि दरम्यान त्या टीव्हीच्या बाजारातील किंमती हळूहळू उतरल्या किंवा स्थिर राहिल्या तर ? म्हणजे आता या स्थितीत माझ्या हमी पावतीला ७००रु.तही कोणी खरेदी करणार नाही. मला ती कमी किंमतीत विकावी लागेल. म्हणजेच मुळात १०००रु. च्या हमी पावतीची बाजारातील किंमत ही, दिवसागणिक गि-हाईक मिळण्याची शक्यता कमी होत गेल्याने कमी कमी होत जावून महीना अखेर शून्य होइल !  

वरील उदाहरण नीट वाचल्यावर आता ऑप्शन कॉन्ट्रॅक्टची सुरुवातीला दिलेली व्याख्या पुन्हा एकदा नीट वाचा बरं ! आता मला खात्री आहे कि ऑप्शन ही संकल्पना एव्हाना नक्की आपल्या ध्यानात येवू लागली असेल. तसे असेल तर पटापट या ब्लॉगला LIKE करा बरं !!

यानंतर आणखी सविस्तर स्पष्टीकरण, तसेच कॉल आणि पुट म्हणजे काय हे बघुया पुढील पोस्टमध्ये !


Read more »