Share/Bookmark

३१ ऑक्टो, २०१७

बाजार अत्युच्च शिखरावर - आता काय करावे ?


२०१४ मध्ये नवे सरकार आल्यापासून आपल्या शेअरबाजाराने सतत वाढ दाखवलेली आहे. २०१४ मध्ये २० हजाराच्या आसपास असलेला सेन्सेक्स आज चक्क ३३ हजाराच्या पूढे गेलेला दिसत आहे. ही वाढ गुंतवणूकदाराना नक्कीच सुखावणारी असली तरी निफ्टी पी/ई रेशो २७ जवळ जाऊन पोचल्यावर आता वारंवार शंका येते कि आणखी किती काळ असेच मार्केट वाढत जाईल ? या शिखरावरुन अकस्मात कडेलोट तर होणार नाही ना ? कि मोदी सरकरची ही टर्म संपेपर्यंत म्हणजे २०१९ च्या लोकसभा निवडणूकीपर्यंत मार्केट असेच वाढत जाईल ? २००८ सालच्या मार्केट क्रॅशच्या आधी निफ्टी पी/ई सुमारे २८ झाला होता. मग आताही तसेच होइल का ? आणि तसे असेल तर आपण नेमके काय करायला हवे ?    
वरील प्रश्नांची नेमकी उत्तरे कुणाला देता येत नसली तरी आपण अगदीच असहाय नाही आहोत. कारण इतिहासात अशी परिस्थिती आधीही येवून गेलेली आहे आणि निफ्टी पी/ई रेशो व्यतिरिक्त बाजार नक्की किती महाग वा धोकेदायक झालाय हे मोजण्याचे आणखीही दोन निकष प्रचलित आहेत.
प्रथम जरा इतिहासात डोकावूया. नजिकच्या काळात २००२ मध्ये व २००८ मध्ये जागतिक बाजारात प्रचंड मंदी आल्याची नोंद आहे. २००२ मधील मंदीला टेक्नॉलॉजी वा डॉटकॉम बबल असा तर २००८ च्या मंदीस सबप्राईम लोन बबल असा संदर्भ आहे.( सध्या भारतातही बॅन्कांच्या “एनपीए” चे प्रकरण मला अमेरिकेतील सबप्राईम बबलची आठवण करुन देते. असो.)
   
उपलब्ध नोंदीनुसार दोनही वेळी निफ्टी पी/ई हा २८ पर्यंत गेलेला दिसतो. या एकाच निकषाचा विचार केला तर याक्षणी आपलेकडील सर्व शेअर्स विकून टाकावे असा अर्थ निघेल.. पण थांबा !. निफ्टी पी/ई रेशो हा प्रमुख निकष असला तरी अधिक अचूक अंदाज येण्यासाठी निफ्टी पी/बी रेशो (प्राईस/बूक वॅल्यु) आणि निफ्टी डिव्हीडंड यिल्ड असे आणखी दोन निकषही वापरले जातात.

बूक वॅल्यु म्हणजे काय हे आपल्यापैकी अनेकाना नक्कीच माहिती असेल. थोडक्यात सांगायचे तर एखाद्या कंपनीची सर्व मालमत्ता विकायला काढली तर किती मूल्य होइल ती त्या कंपनीची बूक व्हॅल्यु. अशा बूक व्हॅल्युला त्या कंपनीच्या एकूण शेअर्सच्या संख्येने भागले तर मिळेल ती “बूक वॅल्यु पर शेअर. कंपनीच्या एका शेअरच्या आजच्या किमतीचा, या ‘बूक व्हॅल्यु पर शेअर’शी असलेला रेशो म्हणजे प्राईस पर बूक (पी/बी) रेशो. तर निफ्टीच्या सर्व कंपन्याचा मिळून असा पी/बी रेशो काढला जातो आणि याद्वारे निफ्टी इन्डेक्स हा, निफ्टीमध्ये समावेश असलेल्या ५० कंपन्यांच्या एकुण मालमत्तेच्या किती प्रमाणात वाढला आहे हे समजते. 
संदर्भासाठी कृपया खालील दोन चार्ट पहा. 

२००२ सालच्या मंदीच्या आधी म्हणजे २००० सालाच्या सुरुवातीला जेव्हा पी/ई रेशो हा २८ वर पोचला होता त्यावेळी पी/बी रेशो ५ च्याही पूढे गेला होता. हे बाजार अती महागल्याचे लक्षण होते. आजच्या घडीला निफ्टीचा पी/बी रेशो हा ३.५० एवढा आहे. २००७ सालच्या अखेरीसही चित्र असेच दिसते. तेव्हा पी/ई रेशो हा २८ वर गेला होता तेव्हा पी/बी रेशोही ६ वर पोचल्याचे दिसते. तेव्हा २००० आणि २००७ सालच्या तुलनेत सध्या अजूनही (पी/ई रेशो २७ जवळ पोचला असला तरी) पी/बी रेशो मात्र फार वाढलेला नाही व निदान त्याआधारे निफ्टीमधील तेजी अजूनही बाकि आहे व बाजाराचे शिखर अजूनही यायचे आहे असे मानायला जागा आहे.

या तेजीनंतर आलेल्या २००२ आणि २००९ च्या ऐन मंदीत मात्र हा पी/बी रेशो २ पर्यंत आणि पी/ई रेशो १५ च्या खाली घसरलेला दिसतो. याचाच अर्थ तेव्हा बाजारात स्वस्ताई आली होती आणि ती शेअर्स खरेदीची उत्तम वेळ होती असे म्हणता येइल.

 तिसरा निकष म्हणजे निफ्टी डिव्हीडंड यिल्ड. निफ्टी डिव्हीडंड यिल्ड हा साधारणपणे १ व २ या मर्यादेत रहातो. बाजारातील ऐन तेजीत तो १ वा त्यापेक्षा कमी होवू शकतो तर तीव्र मंदीमध्ये तो २ पेक्षा जास्त झालेला दिसतो. आजच्या घडीला निफ्टी डिव्हीडंड यिल्ड हा १.१ इतका आहे. म्हणजे बाजार हा शिखराच्या जवळ आहे आणि ही विक्री करुन फायदा खिशात घालण्याची वेळ आहे असा अर्थ होतो. तसेच २००९ च्या मार्च महिन्यात ऐन मंदीच्या काळात निफ्टी डिव्हीडंड यिल्ड २.१८ इतका झालेला दिसतो. तेव्हा शेअर्स खरेदी करण्याची ती सर्वोत्तम वेळ होती असे म्हणता येइल.
वरील विवेचनावरुन हे लक्षात येते कि बाजार महाग आहे कि स्वस्त हे ठरवणे तितकेसे कठीणही नाही आणि वरील तीनही रेशोचे अद्ययावत रेकॉर्ड हे एनएससी च्या वेबसाईट वर या ठिकाणी उपलब्ध आहे.

तेव्हा आपल्याकडील सगळेच शेअर्स विकुन टाकण्याची वेळ अजून आलेली नाही मात्र बाजार इतका वाढल्यावर एखाद दुसरी “डीप”येण्याची शक्यता नेहमीच असते. त्यातच नॉर्थ कोरिया प्रकरण व तशा प्रकारची एखादी घटना अचानक झाली तर आपण तयार रहाण्याची ही वेळ आहे हे मात्र नक्की. किंवा आपल्याकडील अर्धे-अधिक शेअर्स विकुन मार्केट पडण्याची वाट बघत बसणे ही “दोन दगडीवर पाय” ठेवण्याची अस्सल म-हाटी कल्पनाही मुळीच चुकीची नाही बरं का ! शेवटी मार्केट पडलेच तर वरील निकषांवर लक्ष ठेवून ऐन स्वस्ताईत उत्तम शेअर्सची खरेदी आपणच करणार आहोत हे नक्की !
    

    

5 comments:

  • Girish Patil says:
    ०२ नोव्हेंबर, २०१७

    Can you write your share market articles for IndiaStudyForum. Plesae visit www.indiastudyforum.com for more details.

    Thanks,
    Giriesh Patil

  • Girish Patil says:
    ०२ नोव्हेंबर, २०१७

    Please drop me an email if you have any further queries.
    girishpatil16@gmail.com

  • Prabhakar Dalvi says:
    १८ नोव्हेंबर, २०१७

    Namaskar waiting for your updates. Keep it updated

  • Saloni sharma says:
    २६ जुलै, २०१८

    Nice Blog !
    Most of the smallcap stocks slipped between 30 and 50 per cent during this selloff. Free Intraday Tips

  • Support Chittaranjan Infotech says:
    १० ऑगस्ट, २०२०

    everyone must read this blog,Sharing great information about stock market.
    Thanks,keep updating.