Share/Bookmark

२९ सप्टें, २०१८

तीव्र घसरण - बाजाराची व रुपयाची !

  माझ्या नियमित वाचकांना आठवतच असेल कि या वर्षाच्या सुरुवातीलाच मी लिहिले होते कि निफ्टी पी/ई रेशो हा 27 पेक्षा जास्त झालेला आहे आणि आता मार्केट खूपच महागले आहे तेव्हा याहून फार जास्त वाढेल अशी अपेक्षा करण्यापेक्षा अधिकांश शेअर्स विकून आपला पैसा बँक एफ डी सारख्या सुरक्षित. ठिकाणी वा इतरत्र गुंतवावा आणि मार्केट खाली येण्याची वाट बघावी.

मी हे लिहील्यानंतरही सहा महिने मार्केट थोडे कन्सॉलिडेट होत होते व थोडे वाढलेही. शेवटी तर निफ्टी पी/ई रेशो 28 च्याही वर गेला आणि अखेर सप्टेंबरमध्ये व्हायचे तेच झाले .
बाजाराचा गुणधर्मच असा असतो कि दर वेळेस तेजीच्या शिखरावर असताना वा तीव्र मंदीमध्ये सर्वसामान्यांना असे वाटत राहाते कि यावेळी काहीतरी निराळे होणार . 2008 प्रमाणे आता होणार नाही व आताची परिस्थिती निराळी आहे म्हणून. 
याच मानसिकतेचा फायदा घेऊन गेले सात आठ महिने विशेष चांगली काहीही बातमी नसताना देखील बाजार अत्युचच पातळीवर झुलवत ठेवला गेला आणि मोठे प्लेअर्स त्यांच्याकडील शेअर्स याचवेळी हळूहळू विकत गेले. दरवेळी अगदी असेच होत असते फक्त कारणे वेगवेगळी असतात . चार्ट पॅटर्न थोडेफार निराळे दिसतात. पण मूलभूत सत्य हेच असते कि अतीउंचावर टिकून राहणे फार काळ जमत नसते.
अनेकांचा असा विश्वास असतो कि थेट शेअर्स न घेता म्युच्युअल फंड वा सिप च्या माध्यमातून पैसे गुंतवले तर धोका नसतो म्हणून. पण हे अर्धसत्य आहे. फंडाचा पैसा हा बाजारातच गुंतवलेला असतो आणि कितीही उत्तम शेअर्स मध्ये ही गुंतवणूक असली तरी हे उत्तम शेअर्सही मंदीच्या झळीपासून अलिप्त राहू शकत नाहीत.
एक मात्र खरं कि उत्तम शेअर्स दीर्घावधीत पुन्हा जुनी उंची गाठतात व त्यापुढेही वाढू शकतात. पण कळीचा मुद्दा हाच आहे कि दरम्यान जो दोन ते तीन वर्षांचा मंदीचा कालावधी असतो तेवढ्यापुरते तरी हे उत्तम शेअर्ससुद्धा निगेटिव्ह रिटर्न्स देण्याची शक्यता अधिक असते
मग तेवढ्या काळापुरते हे पैसे बँक एफ डी सारख्या ठिकाणी फिक्स इन्कम मध्ये गुंतवले तर त्यात वाढ होत राहील आणि खूप स्वस्ताईच्या काळात म्हणजे निफ्टी पी/ई 15 पेक्षा खाली गेल्यावर हाच पैसा त्याच उत्तम शेअर्समध्ये गुंतवता येइल व त्याच रकमेमध्ये अधिक शेअर्स खरेदी करता येतील.
अर्थात ज्यांनी आधीच सिप द्वारे गुंतवणूक सुरु केली आहे त्यांनी बाजार उतरत असताना सिप थांबवू नये तर सुरु ठेवणेच हिताचे. मात्र नव्याने सिप सुरु करण्याची ही वेळ नव्हे.
सिप योजनासुद्धा बाजार स्वस्त असताना सुरु केली तर तूलनेने लवकर नफ्यात येते हाच अनुभव आहे.

हल्ली दुसरा एक चर्चेत असणारा मुद्दा म्हणजे डॉलारच्या तुलनेत घसरलेला रुपया. याकारणाने अनेक जण बाजारात गुंतवणूक धोक्याची मानत आहेत.मात्र याबाबत माझे मत अगदी विरुद्ध आहे.
घसरत्या रुपयामुळे महागाई वाढते व सर्वच वस्तू उत्पादने तसेच कमोडिटीज व सेवा (सर्व्हिसेस ) या महागतात हे सर्वानाच माहीत आहे.
आता असा विचार करा कि आपण एका खाद्यपदार्थ बनवणार्या कंपनीचा शेअर घेतो म्हणजे नेमके काय करतो ? तर त्या कंपनीचे छोटेसे मालकच बनतो. कंपनीची उत्पादनाची जी क्षमता आहे ती क्षमताच छोट्या प्रमाणात का होईना आपण धारण करत असतो. वाढत्या महागाईमुळे त्या उत्पादनाची किंमत वाढणारच असते आणि उत्पादक म्हणजे मालक अशा वाढीव किमतीला उत्पादन विकून फायदा मिळवणारच असतात.
तीच गोष्ट आहे सेवा पुरवण्याची. अमूक एक सेवा महागाईमुळे स्वस्त झाली असं
कधी आपण ऐकलंय का ? तर सर्व प्रकारच्या सेवासुद्धा घसरत्या रुपयामुळे महागच होत असतात.
याचाच अर्थ असा कि शेअर धारण करणे म्हणजे अप्रत्यक्ष रित्या उत्पादन व सेवा पुरवण्याची क्षमताच धारण करण्यासारखे असल्याने ही क्षमता महागली कि शेअरची किंमत नक्कीच वाढणार असते.
उत्तम कंपन्यांची उत्पादने व सेवा या कितीही महाग झाल्या तरी लोक त्यांचा वापर करणारच आहेत. व अशा कंपन्यांना फायदा होतच राहाणार आहे .
तेव्हा डॉलर रूपया दराबाबत मिडीया मध्ये व राजकीय ओरड होत असली तरी 
कंपन्या फायदा कमावण्याचे थांबवणार नाहीत. मग चढत्या भावाच्या शेअर्समध्ये पैसा गुंतवायचा कि घसरत्या चलनाला धरून राहायचे हे आपण ठरवायचे आहे.
एक मात्र खरे कि अशा निगेटीव्ह बातम्या येत असताना व 2019 हे निवडणूक वर्ष येत असल्याने मार्केट सावधगिरी बाळगेल.आक्रमक खरेदी कुणीच न केल्याने वीकनेस राहील .तशात एकूणच मार्केटने शिखर आधीच गाठल्याने कदाचित बेअर मार्केट सुरु झाले तर आता दोन तीन वर्षे खाली येण्याची वा नरमाईचीच शक्यता जास्त असेल. मात्र केवळ रुपया घसरला म्हणून बाजार कायम पडत रहाणार नाही हे समजून घेणे गरजेचे आहे.
शेवटी एकच सांगतो कि 1990 पासून रुपया दरवर्षी सरासरी पाच टक्के घसरत आहे मात्र याच काळात सेन्सेक्स ने तब्बल वार्षिक 14 टक्के वाढ दाखवली आहे हे नाकारता येईल का ?

Read more »

७ एप्रि, २०१८

BSE डॉलेक्स-३० आणि अमेरिकन इंडेक्स ...

माझ्या सर्व वाचकांना आठवतच असेल कि नववर्षदिनी लिहिलेल्या माझ्या या आधीच्या पोस्टमध्ये आपण मार्केट करेक्शनविषयी बोललो होतो. माझ्या अपेक्षेप्रमाणेच मार्केट तेव्हापासून बरेच घसरलेही. मात्र ही तात्पुरती घसरण आहे कि २००८ प्रमाणे रिसेशनची सुरुवात आहे याबद्दल निष्कर्ष काढणे खरोखर कठीण आहे.
अशा परिस्थितीत सर्व माध्यमातून व चॅनेल्स वरून अनेकदा याविषयी मते मांडली जात आहेत. अशाच चर्चेत अलीकडे एक थोडा वेगळा मुद्दा मांडला गेलाय त्याबद्दल आज बोलूया. 

हा वेगळा मुद्दा आहे तो सेन्सेक्सची खरी किंमत डॉलर टर्ममध्ये मोजण्याचा. आपणा सर्वाना माहीतच आहे कि आपल्या भारतीय शेअरबाजारात विदेशी  गुंतवणूकदार मोठी गुंतवणूक करत असतात. एवढेच नव्हे तर त्यांची ताकद मोठी असल्याने अनेकदा आपल्या बाजाराची दिशा तेच ठरवतात असे बोलले जाते. असो. आपला विषय तो नाही, मात्र हे परकीय गुंतवणूकदार ज्याना (FII) असे म्हटले जाते, ते  साहजिकच सोने वा पेट्रोलियम या ग्लोबल कमोडीटी प्रमाणेच येथील शेअर्सची वा निर्देशांकाची किंमतही रुपयात न मोजता डॉलरमध्येच मोजतात. या कारणाने बॉम्बे स्टोक एक्सचेंज ने एक खास वेगळा निर्देशांक स्थापन केला आहे. जसा बीएसई 30- सेन्सेक्स तसा हा डॉलेक्स-30. हा इंडेक्स सन २००१ मध्ये सुरु केला गेला. हा खरेतर सेन्सेक्सचेच एक रूप आहे पण त्याची किंमत मात्र डॉलर्स मध्ये मोजली जाते. हे डॉलर टर्म म्हणजे काय प्रकरण आहे आणि आताच त्याची एवढी चर्चा कशाला होत आहे ते आता बघुया.

बरोबर दहा वर्षापूर्वी म्हणजे जानेवारी २००८ मध्ये सेन्सेक्स २१००० च्या थोडा वर होता आणि त्या काळची ती सर्वोच्च पातळी होती. आणि आता जानेवारी १८ मध्ये तो सर्वोच्च पातळीवर म्हणजे सुमारे ३६००० वर  पोचला होता म्हणजे २००८ ची उच्च पातळी जरी लक्षात घेतली तरी आता सेन्सेक्स त्या उच्च पातळीच्याही  सुमारे पावणेदोन पट झाल्याचे सहजच कळते आहे. याचाच अर्थ तो आता बराच महाग झाला आहे. पण हे सर्व आपण पहातोय ते भारतीय चलनाच्या मोजमापात. मात्र विदेशी गुंतवणूकदार हेच सर्व आकडे पहातात ते डॉलरच्या मोजमापात.आणि खरी मेख येथेच आहे.

दहा वर्षापूर्वी एका डॉलरची किमत त्यावेळच्या  दरानुसार सुमारे  ४० रु. होती. पण सध्याच्या दरानुसार डॉलरची भारतीय चलनातली किंमत पोचली आहे सुमारे ६५ रु. वर !  भारतीय चलन सुमारे साठ टक्के घसरल्याने भारतात सर्वच वस्तूंच्या किमती वाढलेल्या दिसत आहेत. मात्र अमेरिकेत तशा त्या वाढलेल्या नाहीत. याचाच अर्थ आपल्या दृष्टीकोनातून सेन्सेक्स महागला असला तरी डॉलर्सच्या माध्यमातून गुंतवणूक करणा-या विदेशी गुंतवणूकदाराना तो तितकासा महाग वाटत नसणार हे स्पष्ट आहे . विशेषत: याच दहा वर्षांत अमेरिकन इंडेक्स 'डाउ जोन्स' मात्र त्यांच्या दृष्टीकोनातूनही  महागला आहे.

अधिक खुलाशाकारता कृपया खालील डॉलेक्स-30 चा ग्राफ पहा.
   
वरील ग्राफ पाहिल्यास लगेच लक्षात येईल कि २००८ साली डॉलेक्स-३० ने ४४०० ही सर्वोच्च पातळी गाठली होती आणि तब्बल दहा वर्षानंतरही जानेवारी २०१८ मध्ये तो ४६०० ही सर्वोच्च पातळी दाखवतोय. म्हणजे प्रत्यक्षात दहा वर्षानंतरही तो आहे तिथेच आहे. अशा परिस्थितीत विदेशी गुंतवणूकदाराना तो महाग वाटायची शक्यता नाही कारण याच दहा वर्षाच्या काळात 'डाउ जोन्स' ने १४००० वरून थेट २६००० ची झेप घेतलेली आहे. ही जवळजवळ दुप्पट वाढ बघता डॉलेक्स हा तुलनेत स्वस्तच आहे. आपला सेन्सेक्स जी वाढ दाखवतोय ती प्रत्यक्षात वाढ नसून रुपयाच्या किमतीत झालेली घट आहे - आता बोला !
मित्रानो वरील मत हे माझे मत नसून अलीकडेच वाचनात आलेला मुद्दा आहे जो काही जाणकार मांडत आहेत. त्यांच्या मते सेन्सेक्स मध्ये आता यापुढेच खरी वाढ दिसणार आहे कारण डाउ जोन्स ने शिखर गाठल्याने आता तेथील बाजारातून पैसा काढून घेवून तोच पैसा इमर्जिंग मार्केट्समध्ये म्हणजे भारतासारख्या विकसनशील देशाच्या मार्केट्स मध्ये गुंतवला जाईल. या त्यांच्या विधानाला अधिक जोर येण्यासाठी ते जाणकार हेही सांगत आहेत कि यापुढची दहा वर्षे अमेरिकेची नसून भारतासारख्या देशांची असणार आहेत.
आपल्या देशाविषयी आशादायक वा अनुकूल मत असायला माझी काही हरकत नाही, मात्र हे सगळे प्रत्यक्षात होणार आहे का हाच खरा प्रश्न आहे.
अमेरिकेच्या मार्केटने शिखर गाठलेले आहे हे सत्य आहे पण तसे ते जेव्हा २००७  मध्येही गाठले होते त्यानंतर काय झाले हे सर्वांनाच माहित आहे. २००८ मध्ये अमेरिकेबरोबरच सर्व जागतिक बाजार व आपला सेन्सेक्सही कोसळत गेला. म्हणजे एकप्रकारे अमेरिकेच्या बाजाराचे आपण अनुकरण करत गेलो इतकेच. 
त्यातच भारतातील सध्याची परिस्थिती सुद्धा बँकांच्या बुडीत कर्ज प्रकरणामुळे फारशी विश्वासार्ह राहिलेली नाही. एक म्हण आहे कि जर किचनमध्ये एक झुरळ दिसले तर त्याला मारून काम भागत नसते. एक झुरळ फिरताना दिसले याचाच अर्थ सिंकखाली, कपाटात सांदीकोप-यात आणखी झुरळे नक्की असतात. आपल्याकडील भ्रष्टाचार प्रकरणाचेही तसेच आहे. त्यातच अमेरिका व चीन दरम्यान 'ट्रेड वॉर' सुरु झाले आहे. हे ही इतक्यात संपण्याची लक्षणे दिसत नाही आहेत. अशामुळे जर अमेरिकेचे मार्केट कोसळले तरी तो पैसा भारतीय शेअर बाजारातच येईल कि सोने वा रिअल इस्टेट (कि बिटकॉईन ?) सारख्या सुरक्षित (?) समजल्या जाणा-या ठिकाणी गुंतवला जाईल हे कसे सांगता येईल ?
  अशा ग्लोबल 'सेल-ऑफ' च्या वातावरणात फक्त भारतीय कंपन्या मात्र उत्कृष्ट कामगिरी करून अर्निन्गचे आकडे सुधारतील ही शक्यता अगदीच कमी असेल. त्यामुळे याही वेळी ग्लोबल मार्केट्स पडत गेली तर आपणही त्याला अपवाद ठरणार नाही असेच माझे मत आहे. त्यामुळेच बाजारात कमी भावात काही शेअर्स मिळत असले तरी फार आक्रमकपणे खरेदी करण्याची ही वेळ नाही हे लक्षात ठेवावे. 
देशविदेशातील परिस्थितीत आमुलाग्र बदल झाला तरच मोठी तेजी दिसेल. मात्र ती शक्यता फार कमी दिसते आहे.
सध्या गेले दोन आठवडे निफ्टी इंडेक्स हा २०० DMA च्या आसपास घोटाळताना दिसत आहे. या दोनशे DMA मूव्हिंग अवरेज विषयी पुढील लेखात.

Read more »

१ जाने, २०१८

ढाण्या वाघाच्या शिकारीसाठी बन्दूक भरलेली ठेवा !

माझ्या सर्व वाचक आणि गुन्तवणूकदार मित्राना नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
 नोटाबन्दी, जीएसटी, उत्तरप्रदेश व गुजरात निवडणूका अशा घटनानी व्यापून गेलेले जुने वर्ष सम्पून बघता बघता नवे वर्ष येवून ठेपले देखील !
सरत्या वर्षाच्या शेवटी बाजाराने सर्व अनुकुल प्रतिकूल घटनाना पचवत नवी उन्ची गाठलेली आहे हे सर्व भारतीय गुन्तवणूकदारान्चे भाग्यच आहे.
मात्र साहजिकच आता पूढील वर्षीही बाजार असे भरभरून यश देणार का हा नेहमीचाच प्रश्न सर्वान्च्या मनात आहे.आपण शेअर्स खरेदी केले, त्यावर चान्गला फायदाही झालेला दिसत आहे. पण आता बाजार खुप महाग झालेला असताना आणि विशेषतः निफ्टी पी/ई २७ च्या आसपास असताना ते विकावेत का ? पण त्याच वेळी असेही वाटतेय कि देशाची आर्थिक प्रगती आत्ता कुठे सुरु होत आहे, रुपया सतत वधारत आहे, सरकारने घेतलेल्या निर्णयाची रिफॉर्म्सची फळे लवकरच दिसू लागणार आहेत, अशा परिस्थितीत MOTHER OF ALL BULL RUNS असे ज्याला मिडियामधुन सतत सम्बोधले जात आहे तो बुल रन तर आत्ता कुठे सुरु होणार आहे आणि त्याचा फायदा घ्यायचा तर बाजारात गुन्तवणूक कायम ठेवायला हवी असेही वाटत आहे. खरे ना ?
मग आपण आणखी किती वर्षे आपले शेअर्स होल्ड करायला हवे? १ वर्ष, दोन वर्षे कि तीन ? मला पण याचे नक्की उत्तर माहिती नाही. पण मला मनापासून काय वाटते ते मी आज सान्गणार आहे.

आपण सर्वानी WARREN BUFFET चे नाव ऐकलेच असेल. हे जगप्रसिद्ध आणि महान गुन्तवणूकदार म्हणतात कि त्यान्चा शेअर्स होल्ड करण्याचा काळ हा  FOREVER आहे. म्हणजेच एकदा घेतलेले शेअर्स ते कायम धारण करतात. ते कधीच विकू नये असे त्यान्चे मत आहे. साहजिकच आहे कारण निवडून पारखून घेतलेल्या उत्तम कम्पन्याचे शेअर्स विकावे तरी कशासाठी ? पण या म्हणण्याचा असा शब्दशः अर्थ काढू नये असे माझे मत आहे. कारण त्यान्ची जी बर्कशायर हॅथवे ही कम्पनी आहे त्या कन्पनीचे १९९२ मधले होल्डीन्ग आणि २०१७ मधील होल्डीन्ग  यात खुपच बदल झालेले दिसत आहेत. (नेटवरील माहितीवर आधारित) तेव्हा परिस्थितीनुसार आपल्या पोर्टफॉलिओमध्ये बदल करणे वा विक्री करणे हे आवश्यकच आहे. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्यासारख्या सामान्य गुन्तवणूकदाराचे निवड कौशल्य आणि या वॉरेन बफे साहेबान्चे कौशल्य यात फरक तर असणारच ना ? ;-) 
कम्पनीचा व तीच्या बिझीनेसचा आणि प्रॉफिटॅबिलिटीचा अभ्यास म्हणजेच फन्डामेन्टल स्टडी हा भाग महत्वाचा आहेच पण शेअरचे उन्चावलेले मूल्य किन्वा वॅल्युएशन हा सुद्धा एक कळीचा मुद्दा आहे हे विसरता कामा नये. बाजार नुसताच महाग आहे कि हा एक अती फुगलेला बबल आहे यात मतभेद असू शकतात. त्यामुळे बाजाराचा कडेलोट कधी होणार हे कुणालाच नक्की सान्गता येत नाही. मात्र एका बाबतीत सर्वान्चे एकमत आहे ते म्हणजे बाजारात  OVERBOUGHT आणि OVERSOLD अशा दोन अवस्था आळीपाळीने येत असतात आणि त्या दरम्यान बाजाराला एकदातरी वास्तवाच्या जवळपास अशा किमतीला यावेच लागते. या वास्तवाच्या जवळपास  येण्याच्या प्रक्रियेला MEAN REVERSION असे नाव आहे.साध्या भाषेत आपण याला बाजाराची खरी वा अतिशयोक्त नसलेली पातळी असे म्हणू शकतो. आणि सध्या तरी बाजार या वास्तव पातळीच्या बराच वर आहे हे सत्य कुणी नाकारणार नाही.
तेव्हा आज उद्या वा केव्हातरी बाजार कुठल्याही निमीत्ताने कोसळणार हे अतिशय साधे सरळ सत्य आहे. ताणलेला रबर जसा सोडुन दिल्यावर मूळ स्थितीला जातो तसा बाजार कधीतरी वास्तव पातळीला जाणारच आहे. आणि त्यानन्तर तो पुन्हा तीव्र मन्दीही दाखवणारच आहे. मात्र तो जेव्हा असा तळाला जाईल तेव्हा त्या स्वस्ताईचा फायदा घेण्यासाठी माझ्याकडे पैसा तयार असायला हवा. नाहीतर व्हायचे असे कि देशाच्या प्रगतीच्या मोहक चित्राने आणि 'मदर ऑफ ऑल बुल रन्स' वगैरे कल्पनामध्ये रमून बाजारात आपलीअधिकान्श रक्कम गुन्तवलेली असतानाच एक दिवस अचानक कडेलोटाचा उगवेल.
जर २००८ प्रमाणे तीव्र घसरण झाली तर पैसा बाहेर काढायचीही सन्धी मिळणार नाही. असे यापूर्वीही झालेले आहे आणि यापूढेही होणारच आहे.
तेव्हा पूढील नजिकच्या काळात येवू शकणा-या तीव्र मन्दीत स्वस्तात मिळणारया उत्तम कन्पन्याचे शेअर्स घेण्याची व भरघोस फायदा मिळवण्याची मोठी सन्धी साधायची कि उरल्या सुरल्या तेजीच्या आशेने आणखी थोड्याशा फायद्यासाठी वाट पहात रहायचे हे ठरवावेच लागेल.
माझ्या मते तरी आता लहान सहान प्राण्यान्ची शिकार करण्यात आपल्या बन्दूकीच्या गोळ्या दवडण्यापेक्षा जेव्हा कधी पुढ्यात मोठा ढाण्या वाघ येइल तेव्हा माझ्याकडील बन्दूक भरलेली असणे जास्त महत्वाचे!.
तात्पर्य हे कि आपलयाकडील बहुतान्श शअर्सची  विक्री करुन व थोड्या प्रमाणात शेअर्समधे गुन्तवणूक ठेवून योग्य सन्धीची वाट बघावी. शेअर्स विक्रीतून आलेली  रक्कम अन्य सुरक्षीत योजनेत गुन्तवून आपली बन्दूक भरलेली ठेवा.
सन्धी कुठल्याही रुपात येइल- कधी नॉर्थ कोरियाच्या तर कधी देशी बॅन्कान्च्या बुडीत कर्ज प्रकरणाच्या !
 खरे ना ?

Read more »